एक दिवस शाळेसाठी उपक्रमात सहभागी व्हाः अनिल पाटील

गोंदियाः शालेय शिक्षणाच्या सोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दप्तरमुक्त शाळा अभियानाची जिल्ह्यात सुरुवात करण्यात आली. या अभियानाचा पुढचा टप्पा म्हणजे अधिकारी-कर्मचार्‍यांनी एक दिवस शाळेसाठी भेट हा आहे. या अभियानात जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुखांनी सहभागी होऊन आपल्या विभागाविषयी विद्यार्थ्यांना माहिती द्यावी व प्रशासनाकडून त्यांच्या काय अपेक्षा आहेत हे जाणून घ्यावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी केले आहे. या आशयाचे पत्र त्यांनी सर्व विभागप्रमुखांना लिहले आहे.

बालकाचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अन्यये प्रत्येक बालकाला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणे अपेक्षित आहे. कोविड 19 महामारीमुळे दोन वर्षाच्या शैक्षणिक नुकसानाची उणिव भरून काढणे कठीण असतांना सुध्दा विद्यार्थ्यांना शाळेच्या प्रवाहात आणणे जिकरीची बाब आहे. कोविडची परिस्थिती निवळल्यानंतर बालके शाळेच्या मुख्य प्रवाहात जुळली असून सातत्याने गुणवत्ता संवर्धनाचे धडे घेत आहेत. शालेय शिक्षणाच्या सोबतच विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी दप्तरमुक्त शाळा अभियानाची सुरुवात करण्यात आली. या अभियानाचा पुढचा टप्पा म्हणजे अधिकारी व कर्मचार्‍यांनी एक दिवस शाळेसाठी भेट हा आहे. दैनंदिन जीवनामध्ये विद्यार्थ्यांच्या जीवन कौशल्य वाढीकरीता उपयुक्त कौशल्य विकसित होण्याच्या उद्देशाने विविध उपक्रमाच्या आयोजनातून विद्यार्थ्यांचे व्यावसायिक जीवन सार्थक होण्यामागचा सदर उपक्रमाचा हेतू आहे.

बहुआयामी व्यक्तिमत्व निर्माण करणे, विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देणे, शिका व कमवा या उक्तीचा वापर करून विद्यार्थ्यांना स्वयंरोजगार निर्माण करणे, तशी वृत्ती व कौशल्ये त्यांच्या अंगी रुजावे तसेच प्रत्येक शनिवारी दप्तरमुक्त शाळा अभियान राबविणे आवश्यक आहे. गोंदिया जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुखांनी शाळेला भेट द्यावी व दप्तरमुक्त शनिवार या उपक्रमाबाबत आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना ‘एक दिवस शाळेसाठी’ या अंतर्गत कोणत्याही शनिवारी गावातील, तालुक्यातील, जिल्ह्यातील शाळेला भेट देण्याबाबत सुचित करावे, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. शासन प्रशासन अनेक लोकोपयोगी योजना तसेच उपक्रम राबवित असते. या उपक्रमाची व योजनांची माहिती विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासून प्राप्त झाल्यास त्यांचा शासन प्रशासनाप्रती विश्वास वृद्धिंगत होईल. या उद्देशाने आपल्या विभागातंर्गत असलेले कार्य शालेय विद्यार्थ्यांना अवगत करावे. आपल्या विभागाची संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना देण्यात यावी. ही माहिती देतांना अत्यंत सोप्या भाषेत व विद्यार्थ्यांना सहज समजेल अशा स्वरूपात द्यावी. क्लिष्ट आकडेवारी टाळावी. शक्यतो बालगीत, बालनाटिका, गाणी अथवा खेळाच्या स्वरूपात दिल्यास ती लहान मुलांना अधिक परिणामकारकपणे समजेल. असे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी दिलेल्या पत्रात केले आहे.

Share