सालेकसा येथे आढळले नक्षली बॅनर

सालेकसाः तालुका मुख्यालयापासून सहा किलोमीटर अंतरावरील गोर्रे व छत्तीसगड राज्याच्या सिमेवरील डोंमाटोला या दोन गावादरम्यान 28 नोव्हेंबर रोजी नक्षली बॅनर आढळले. यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

सालेकसा तालुका आदिवासीबहूल, नक्षलग्रस्त व अतिसंवेदनशील म्हणून ओळखला जातो. तालुक्यात नक्षलदृष्ट्या संवेदनशील भागात मागील काही वर्षात नक्षल्यांच्या हालचाली कमी झाल्या आहेत. मात्र अधूनमधून नक्षल्यांद्वारे गावशिवारात वा रस्त्यावर नक्षली बॅनर, फलक, पॉम्प्लेट लावले व टाकल्या जातात. त्यातच 28 नोव्हेंबर रोजी तालुक्यातील गोर्रे ते डोमाटोला दरम्यान नक्षल्यांनी बॅनर लावल्याचे आढळले. घटनेची माहिती मिळातच पोलिस निरीक्षक जनार्दन हेगडकर व त्यांच्या चमूने घटनास्थळ गाठून नक्षल्यांनी लावलेले बॅनर काढले. या बॅनरवर ‘भारत की कम्युनिस्ट पार्टी जिंदाबाद’, ‘नवजनवादी क्रांती जिंदाबाद’, ‘जनमुक्ती छापार सेना जिंदाबाद’ असे लिहिले होते. हे बॅनर दर्रेकसा नक्षल एरिया कमिटीने लावल्याचे शंका व्यक्त केली जात आहे .

Share