अनधिकृत लेआऊट चौकशी समितीची तिसरी सभा एक डिसेंबरला

गोंदिया दि. 25: अनधिकृत लेआऊटसाठी नेमण्यात आलेल्या चौकशी समितीची पहिली सभा 15 नोव्हेंबर रोजी घेण्यात आली होती. या सभेत केवळ 08 तक्रारी प्राप्त झाल्या. तर दुसरी सभा 22 नोव्हेंबर रोजी झाली. या सभेला सुद्धा अल्प प्रतिसाद मिळाला असून केवळ तीन निवेदन प्राप्त झाली. नागरिकांचा अल्पसा प्रतिसाद पाहता समितीची तिसरी सभा 01 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आली आहे.
राज्याचे महसूल, पशूसंवर्धन, दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या गोंदिया जिल्हा दौरा वेळी गोंदिया शहरातील व क्षेत्रातील लेआऊटमधील जागा खाजगी व्यक्तीनी बळकावणे, नगर परिषदेच्या जागेवर खाजगी व्यक्तीनी कब्जा करणे. शासकीय जमिनीचे अभिलेख खाजगी व्यक्तीचे नावे तयार करणे व परस्पर विक्री करणे अशा स्वरूपाच्या तक्रारी विविध लोकप्रतिनिधीव्दारा करण्यात आल्या होत्या. या तक्रारीचा संदर्भ विचारात घेऊन जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी अपर जिल्हाधिकारी राजेश खवले यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत केली आहे.
चौकशी समिती खालील प्रमाणे आहे. अध्यक्ष अपर जिल्हाधिकारी, गोंदिया, सदस्य म्हणून जिल्हा अधिक्षक भुमी अभिलेख, गोंदिया, मुख्याधिकारी, नगर परिषद, सडक अर्जूनी सहाय्यक संचालक नगर रचना, गोंदिया यांचा समावेश करण्यात आला आहे.
सदरहू चौकशी समितीची पहिली सभा 15 नोव्हेंबर रोजी सकाळी जिल्हाधिकारी, कार्यालयातील सभागृह (DPC हॉल) येथे आयोजित करण्यात आली होती. सदरहू सभेत एकूण 08 तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. दुसरी सभा 22 नोव्हेंबर रोजी घेण्यात आली. या सभेला सुद्धा अल्प प्रतिसाद मिळाला असून केवळ तीन निवेदन प्राप्त झाली व ती समितीपुढे ठेवण्यात आली. मात्र सदरहू चौकशी समितीपुढे प्राप्त झालेल्या अल्पशा तक्रारीचा विचार करता, या अनुषंगाने सर्व सामान्य नागरीक, लोकप्रतिनिधी यांना तक्रारी सादर करणेबाबत पुश्नच: संधी देऊन समितीची तिसरी सभा 01 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी, कार्यालयातील सभागृह (DPC हॉल) येथे ठेवण्यात आलेली आहे. तरी याबाबत काही माहिती असल्यास किंवा याबाबत त्यांच्या तक्रारी असल्यास, त्यांनी त्याबाबतचे निवेदने समितीपुढे द्यावी, असे आवाहन समितीचे अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी केले आहे.
00000

Print Friendly, PDF & Email
Share