अहिंसा व एकात्मतेसाठी धावली जिल्ह्यातील तरूणाई

पोलिस दलाच्या अहिंसा दौडला उत्स्फूर्त प्रतिसाद

गोंदियाः बिरसा मुंडा जयंती निमित्त गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे, मंगळवार, 15 नोव्हेंबर रोजी आयोजित अहिंसा दौडला जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला. अहिंसा व एकात्मतेसाठी जिल्ह्यातील तरूणाई स्वयंस्फूर्तीने धावली. तीन गटात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत 1400 युवक, युवती व ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले. जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली अतिशय कमी वेळेत या स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन करण्यात आले. अहिंसा दौड स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन जिल्हाधिकारी नयना गुंडे यांच्या हस्ते सकाळी पाच वाजता करण्यात आले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अरविंद वानखेडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, उपवनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र जयरामेगौडा आर., सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी देवरी अनमोल सागर, मुख्य न्यायदंडाधिकारी ए. व्ही. कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, अपर पोलिस अधीक्षक अशोक बनकर, जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

अहिंसा हे दुर्बलांचे नाही तर सबलांचे प्रतिक असून ‘अहिंसा परमो धर्म’ आहे. या विषयाच्या अनुषंगाने अहिंसा दौड ही महत्वपूर्ण पाऊल आहे. या भव्य व नियोजनबद्ध आयोजनासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक व पोलीस दल अभिनंदनास पात्र आहे, असे जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात सांगितले. तर या स्पर्धेतून अहिंसा व एकात्मता हे महत्वाचे संदेश देणारी ही दौड असून हाच व्यापक संदेश स्पर्धक या ठिकाणाहून घेऊन जातील अशी अपेक्षा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अरविंद वानखेडे यांनी व्यक्त केली. सकाळी 5.30 ला सुरू झालेली दौड शहरातील मुख्य मार्गाने मार्ग क्रमण करून क्रीडा संकुलात या दौडचा समारोप झाला. विजेत्या स्पर्धकांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पदक व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सहभागी सर्व स्पर्धकांना पदक देण्यात आले. अतिशय नियोजनबद्ध अशा या अहिंसा दौड आयोजनात पोलिस दलाने स्पर्धकांची संपूर्ण काळजी घेतली. स्पर्धकांच्या जाण्या येण्यापासून ते अल्पोपहार व भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. कुठलाही धावपटू जखमी होऊ नये अथवा अपघात होऊ नये यासाठी आरोग्य पथक नेमण्यात आली होती. धावण्याच्या मार्गावर ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कार्यक्रमाचे संचालक देविदास कठाळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार अपर पोलिस अधीक्षक अशोक बनकर यांनी मानले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संपूर्ण पोलीस दल व जिल्हा प्रशासनाने परिश्रम घेतले.

ज्येष्ठ नागरिकही धावले…

या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे अहिंसा दौडमध्ये 3 किमी रन अँड वॉक गटात 80 वर्षीय मुन्नालाल यादव यांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेऊन 3 कि.मी. अंतर पूर्ण केले. जिल्हाधिकारी नयना गुंडे व उपस्थित पाहुण्यांनी यादव यांचे विशेष कौतुक केले. स्पर्धेत सहभागासाठी त्यांना विशेष पदक देऊन सन्मानित करण्यात आले.

स्पर्धेतील विजेते..

  • 21 किमी पुरुष गट ः प्रथम लीलाराम बावणे, द्वितीय सनी पुसाटे, तृतीय विजय चुटे.
  • 21 किमी महिला गट ः प्रथम सुषमा रहांगडाले, द्वितीय तेजस्विनी लांबकाने, तृतीय वैशाली मडावी.
  • 10 किमी पुरुष गट ः प्रथम निखार भलावी, द्वितीय मनीष मेश्राम व तृतीय मिलिंद कोवे.
  • 10 किमी महिला गट ः प्रथम सोनिया लिल्हारे, द्वितीय हर्षा मडावी, तृतीय लक्ष्मी गमे.
  • 3 कि.मी. रन अँड वॉक पुरुष गट ः प्रथम नागेश देवकर, द्वितीय रुपेश सुलाखे, तृतीय कृष्णा बिसेन.
  • 3 किमी महिला गट ः प्रथम पूजा येडे, द्वितीय कोमल उके व तृतीय क्रमांक चेतना बावनकर
Print Friendly, PDF & Email
Share