गोंदियात 15 तलवारींसह 14 चाकू जप्त
गोंदियाः स्थानिक निर्मल शाळेजवळ फुटपाथवरील तंबूमधून हत्यारांची विक्री करणार्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने 14 नोव्हेंबर रोजी सापळा रचून अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून 15 तलावार, 7 स्टील गुप्ती व 7 चाकू जप्त केले. चमकोरसिंग स्वर्णसिंग सिंग, रा. क्लेजर, जि.तामतरन, पंजाब असे आरोपीचे नाव आहे.
कोणत्यातरी मोठा घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने शहरात अवैधरित्या हत्यार आणून रेलटोली परिसरातील निर्मल शाळेजवळील फुटपाथवर आरोपीने तंबू थाटला होता. येथूनच तो हत्यारांची विक्री करीत असल्याची माहिती गुप्तचर विभागाकडून पोलिसांना मिळाली. दरम्यान पोलिसांनी 14 नोव्हेंबर रोजी बनावटी ग्राहक त्याच्याकडे हत्यार खरेदीसाठी पाठविला. त्याने खरेदीचा सौदा पक्का झाल्याचा इशारा देताच सापळा रचून आरोपीला अटक (Swords Seized) केली. त्याच्याजवळून 15 हजार किमतीच्या 15 तलावारी, 3100 रुपयांच्या 7 स्टील गुप्त्या व 3500 रुपयांचे 7 चाकू असे एकूण 21 हजार 600 रुपयांचे हत्यारे जप्त करण्यात आली.
विशेष म्हणजे, आरोपीने 7 नोव्हेंबर रोजी रेल्वेगाडीने शहरात हत्यारे आणली असून त्याची विक्री करीत असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. त्यामुळे आरोपीची कसून चौकशी सुरु असून आतापर्यंत त्याने कुणाकुणाला हत्यारे विकली याचा शोध घेत आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे. याप्रकरणी आरोपीवर भारतीय हत्यार कायद्याच्या भादंवि 4/25, सहकलम 135, महाराष्ट्र पोलिस कायदा 37 (1) (3) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनात व पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस पथक करीत आहेत.