महिलांचे हक्क, अधिकारांसाठी आपला लढा : चित्रा वाघ

गोंदिया: पक्षाने जबाबदारी सोपविली आहे. ही जबाबदारी आपण प्रामाणिकपणे पार पाडू. महिलांचे हक्क, अधिकार त्यांना मिळावे यासाठी आपला लढा आहे. यापुर्वीच्या महाविकास आघाडी सरकाने जे काम अडीच वर्षात केले नाही ते राज्यातील सरकारने तीन महिन्यांत केले. राज्य सरकारने शंभर दिवसांत अडीचशे परिपत्रके काढली. सरकार प्रत्येक घटकांसाठी काम करत असून शेतकर्‍यांना यंदा तिप्पट मदत केली. महिलांचा आवाज बुलंद करण्यासाठी राज्य सरकारची भूमिका महत्वाची आहे. केंद्र व राज्य शासनाच्या योजना घराघरापर्यंत पोहचविण्यासाठी प्रत्येक बूथवर 45 महिला पदाधिकारी काम करतील, यासाठी भाजपची महिला आघाडी प्रयत्नशील असल्याचे भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ यांनी सांगीतले. त्या आज मंगळवार, 15 नोव्हेंबर रोजी येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होत्या.

महिलांच्या समस्या अडचणी जाणून घेण्यासह केंद्र व राज्य शासनाच्या योजना जिल्ह्यातील महिला पदाधिकार्‍यांमार्फत प्रत्येक घराघरापर्यंत पोहचाव्यात यासाठी वाघ या पूर्व विदर्भाच्या दौर्‍यावर आहेत. आज, 15 नोव्हेंबर रोजी त्यांचे गोंदियात महिला मोर्चाच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी महिला समाज भवनात आयोजित महिला मेळाव्यात वाघ यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. पुढे वाघ म्हणाल्या आगामी निवडणुकांमध्ये भाजपला लोकसभेच्या 25 तर विधानसभेच्या 200 पेक्षा अधिक जागा मिळतील. यात महिला मोर्चाचे अमुल्य योगदान राहणार असल्याचे त्या म्हणाल्या. आपल्याला भयमुक्त महाराष्ट्र हवा आहे. यासाठी महिलांचा आवाज बुलंद करण्याची जबाबदारी प्रत्येक महिला पदाधिकारीची आहे. महिलांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत सरकारची भूमिकाही तितकीच महत्वाची आहे. सरकार सत्तारुढ होताच अनेक लोककल्याणकारी निर्णय घेतले.

नंदुरबार येथील घटनेतील गुन्हेगारांना शिक्षा असो की कर्त्यव्यात कसूर करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई. महिलांची सुरक्षा, त्यांचे सक्षमिकरण, आरोग्य, शिक्षण यासंर्भात सरकारशी चर्चा करू. आपण प्रत्येक्ष प्रशासकीय अधिकार्‍यांच्या भेटी घेऊन महिलांच्या समस्या, अडचणी मांडल्या आहेत. महिलांना त्रास झाल्यास अशावेळी पोलिस प्रशासनाची भूमिका महत्वाची असते. त्यांनी त्यांच्या मदतीला तत्काळ धावून जाणे गरजेचे आहे. यामुळे निर्भयासारख्या प्रकारांवर निश्चितच आळा बसेल, असा दावाही त्यांनी केला. जिल्ह्यातील समस्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

उत्तरप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही कायदा व्हावा यासाठी आपण आग्रही असल्याचे सांगून भविष्यात हे सरकार निश्चितच असा कायदा आणेल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकर्‍यांच्या पाठीशी सरकार आहे. धान उत्पादकांना बोनस देण्यासंदर्भात सरकारने समिती स्थापन केली आहे. ही समिती सरकारला लवकरच आपला अहवाल सादर करणार असून सकारात्मक निर्णय शासन घेईल. धान उत्पादकांनी चिंता करण्याची गरज नसल्याचेही त्या म्हणाल्या. यावेळी महिला मोर्चाच्या जिल्हा अध्यक्षा भावना कदम, भाजपचे जिल्हाध्यक्ष केशवराव मानकर, माजीमंत्री राजकुमार बडोले, प्रदेश कार्यकारिणी सदस्या रचना गहाणे, जिप सभापती सविता पुराम, जिप सदस्या रचना गहाणे, सिता रहांगडाले, माधुरी रहांगडाले, भंडारा-गोंदिया जिल्हा संपर्क प्रमुख विरेंद्र अंजनकर, जिल्हा महामंत्री लायकराम भेंडारकर, भाजप शहर अध्यक्ष सुनिल केलनका, यांच्यासह भाजपचे इतर महिला व पुरुष पदाधिकारी उपस्थित होते.

Share