गोंदिया जिल्हातील 348 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची रणधुमाळी
गोंदिया ०९ ः राज्य निवडणूक आयोगाने आज बुधवार, 9 नोव्हेंबर रोजी राज्यातील 7751 ग्रामपंचायतींच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. गोंदिया जिल्ह्यात 348 ग्रामपंचायतीसाठी थेट सरपंचासह सदस्य पदासाठी निवडणूक होणार आहे. या संदर्भातील अधिसूचना आज जारी झाल्यानंतर संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रात तत्काळ प्रभावाने आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.
जिल्ह्यात नोव्हेंबर, डिसेंबर 2022 या कालावधी 348 ग्रामपंचायतीच्या कार्यकाळ पूर्ण होत आहे. या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम 9 नोव्हेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण करुंदकर यांनी जाहीर केला आहे. गोंदिया जिल्ह्यातील आठ तालुकामध्ये 348 ग्रामपंचायतीसाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी संबंधित तालुक्याचे तहसीलदार 18 नोव्हेंबर रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. यानंतर 18 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीत नामनिर्देशन मागविणे व भरणे, 5 डिसेंबर रोजी नामनिर्देशन छाननी, 7 डिसेंबर रोजी नामनिर्देशन मागे घेणे व चिन्ह वाटप करणे, 18 डिसेंबर रोजी मतदान, 20 डिसेंबर रोजी मतमोजणी होईल. तर 23 डिसेंबर रोजी निकालाची अधिसूचना जिल्हाधिकारी प्रसिद्ध करतील.गोंदिया तालुक्यातील 71 ग्रामपंचायती, तिरोडा 74, आमगाव 34, गोरेगाव 30, सालेकसा 31, देवरी 25, सडक अर्जुनी 43 आणि अर्जुनी मोर तालुक्यातील 40 ग्रामपंचायतींसाठी अशा 348 ग्रामपंचायतींसाठी 18 डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे.