आता वाहन हस्तांतरण प्रक्रियाही आधारशी संलग्नित होणार

गोंदियाः वाहन हस्तांतरणाची प्रक्रिया ही आभासी असली तरीही कागदपत्रांची छापील प्रत काढून त्यावर स्वाक्षरी करून उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सादर करावे लागतात. तसेच कागदांची पडताळणी करण्यासाठी देखील आरटीओ कार्यालयात जावे लागते. त्यामुळे नागरिकांना या आभासी सेवेचा पाहिजे तसा लाभ होत नाही. म्हणून वाहन हस्तांतरण प्रक्रिया आता आधार कार्डशी जोडण्यात येणार आहे. यामुळे वाहन मालकाची सर्व माहिती संबंधित आरटीओ कार्यालयाला तात्काळ मिळेल. तसेच कागदपत्रे सादर करण्यासाठी आरटीओ कार्यालयात जावे लागणार नसल्याने नागरिकांच्या वेळेत बचत होणार आहे.

ही सुविधा येत्या पुढील आठवड्यात राज्यातील सर्व उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अंतर्गत सुरू करण्यात येणार असल्याचे समजते. यासाठी परिवहन विभागाचे नियोजन सुरु आहे. आरटीओतर्फे लायसन्स, नोंदणी प्रमाणपत्र, कर तसेच परवान्यासंबंधित 115 सेवा देण्यात येतात. त्यापैकी 86 सेवा ऑनलाईन सुरु आहेत. तर 10 सेवा आधार कार्डशी जोडल्या आहेत. यात शिकाऊ लायसन्सची परीक्षा, वाहनांचा राष्ट्रीय परवाना, दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र, ना हरकत प्रमाणपत्र, नोंदणी प्रमाणपत्रावरील पत्ता बदलणे, अनुज्ञाप्तीचे नुतनीकरण या सेवांचा समावेश आहे. यामुळे नागरिकांना आरटीओत जावे लागत नसल्याने वेळ वाचतो. आता परिवहन विभागाने वाहन हस्तांतरण सेवा देखील आधार कार्डशी जोडण्याचा निर्णय घेऊन त्यावर काम सुरु केले आहे. हे काम अंतिम टप्प्यात असून पुढील आठवड्यात ही सेवा उपलब्ध होणार असल्याचे बोलले जात आहे.

जुन्या वाहनाच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारात वाहनाचे कायदेशीरपणे आरटीओतून नव्या मालकाच्या नावे हस्तांतरण करायचे झाल्यास स्वतंत्र प्रक्रिया पूर्ण करावी लागते. वाहन कर्जावर घेतले असल्यास त्याचा बोजा उतरविण्याची प्रक्रियाही करावी लागते. या प्रक्रियेत वाहनांची मूळ कागदपत्रे, अर्जावर जुन्या मालकाची संमतीची आवश्यकता असते.

Share