जिवंत लाभार्थ्याला केले मृत घोषीत, देवरी तहसील कार्यालयाचा अजब कारभार

देवरी ०८: निराधारांना आर्थिक आधार देण्यासाठी शासनाची श्रावणबाळ योजना आहे. दर महिन्याला तहसील कार्यालयाच्यामार्फत लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान जमा केले जाते. मात्र एका लाभार्थ्याच्या बँक खात्यावर गत सहा महिन्यांपासून अनुदान जमा न झाल्याने त्या लाभार्थ्याने प्रथम बँक व नंतर तहसील कार्यालयात चौकशी केली. येथे सत्य समोर आल्यानंतर लाभार्थ्याच्या पाया खालची जमीनच सरकली. देवरी तहसील कार्यालयाच्या संबंधित लिपीकाने लाभार्थ्याला मृत दाखविल्याने त्यांचे 6 महिन्यांपासून अनुदान बंद होते.

देवरी तालुक्यातील चारभाटा येथील 75 वर्षिय श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असलेले रविंद्रकुमार चंदनलाल श्रीवास्तव यांना शासनाच्या श्रावण बाळ योजने अंतर्गत दर महिन्याना 1 हजार रुपयाचे अनुदान रक्कम त्यांच्या बचत खाते असलेल्या बँक ऑफ बडोदा शाखा देवरी येथील खात्यावर जमा होत होती. मार्च 2022 पासून अनुदान रक्कम जमा न झाल्याने श्रीवास्तव यांनी प्रथम संबंधित बँक शाखेत चौकशी केली. त्यांना तहसील कार्यालयाकडून रककम जमा करण्यात आली नसल्याचे सांगीतले. यानंतर त्यांनी देवरी तहसील कार्यालय गाठून चौकशी केली असता लाभार्थी श्रीवास्तव यांना मृत दाखविल्याने त्यांचे अनुदान बंद झाल्याचे सांगण्यात आले. श्रीवास्तव हे निराधार असुन यांना वारस नाही. त्यांच्याकडे शेतीही नाही. योजनेद्वारे मिळणारी रक्कमचे त्यांचा आधार होती. मात्र ही रक्कमही गत 6 महिन्यांपासून मिळाली नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. आपणास मृत दर्शविणार्‍या बेजबाबदार लिपिकावर कारवाई करावी, 6 महिन्यांचे प्रलंबित अनुदान तत्काळ द्यावे, अशी मागणी लाभार्थी श्रीवास्तव यांनी देवरीचे तहसीलदार यांना केली आहे.

Print Friendly, PDF & Email
Share