शून्य माता मृत्यू अभियान यशस्वी

गोंदिया: ज्यांच्या घरी गर्भवती आहे त्यांच्या कुटुंबीयांनी सुरक्षित मातृत्व ची सप्तपदी पाळावी. रक्तदाब नियमित तपासणी करून घ्यावा. मानव विकास शिबिरमध्ये जाऊन स्त्री रोग तज्ञांकडून निःशुल्क आरोग्य तपासणी करून औषोधोपचार करून घ्यावा, उपचार तत्काळ सुरू करावेत म्हणजे शून्य माता मृत्यू अभियान यशस्वी होईल असे, प्रतिपादन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबरीश मोहबे यांनी केले. सुरक्षित मातृत्व अभियान अंतर्गत जिल्हा स्तरीय टास्क फोर्स समितीच्या बैठकीत अध्यक्ष स्थानवरून डॉ. मोहबे बोलत होते.

जिल्ह्यात माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान प्रत्येक आरोग्य केंद्रात राबविण्यात येत आहे. गर्भवतींच्या तपासण्यांमधून 6217 गर्भवतींपैकी 257 गर्भवतींना उच्च रक्तदाब आढळला आहे. त्यामुळे शून्य माता मृत्यू अभियान अंतर्गत जिल्हा पातळीवर सुरक्षित मातृत्व टास्क फोर्सची बैठक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबरीश मोहबे यांनी गुरूवार 7 ऑक्टोबर रोजी आयोजित केली होती. बैठकीला जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. सुतार, जिल्हा साथ रोग अधिकारी डॉ. निरंजन अग‘वाल, आरएमओ डॉ. बी. डी. जयस्वाल, बिजेडब्लूच्या डॉ. सुवर्णा हुबेकर, डॉ. सागर सोनारे, शासकीय रक्तपेढीचे प्रमुख डॉ. संजय चव्हाण, आयसीयु प्रभारी फिजिशियन डॉ. विनोद मोहबे, प्रसूती तज्ञ डॉ. सावंत, भुलतज्ञ डॉ. जामु आनंद यांच्यासह विविध विभाग प्रमुख उपस्थित होते. डॉ. मोहबे यांनी सुरक्षित मातृत्व अभियानचा उद्देश सांगितला. माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानातुन संदर्भ सेवा दिलेल्या हाय रिस्क गर्भवतींना चांगली वैद्यकीय सेवा उपलब्ध करून द्यावी व भविष्यात उच्च रक्तदाबामुळे एकही माता मृत्यू होऊ नये म्हणून दक्षता घेण्याचे सांगीतले. बैठकीला आरोग्य परिचारिका निलू चुटे, कल्याणी चौधरी, शालिनी कोरेट्टी, अर्चना वासनिक आदी उपस्थित होत्या.

Print Friendly, PDF & Email
Share