3.37 लाख बालकांना देणार जंतनाशक गोळ्या
गोंदिया : जिल्ह्यातील अंगणवाड्या व शाळांमध्ये नोंद असलेले तसेच शाळाबाह्य बालकांसह 3,37,651 बालकांना जंतनाशक गोळी देण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. सर्व सरकारी व खाजगी शाळेत शिक्षंकामार्फत व अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविका मार्फत बालकांना जंतनाशक गोळी प्रत्यक्ष खाऊ घातली जाणार आहे. गोळी दिलेल्या प्रत्येक बालक लाभार्थ्यांची नोंद ठेवतील, असे निर्देश जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी दिले आहेत.
राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त वय वर्ष 1 ते 19 या वयोगटातील बालकांना व किशोरवयीन मुलामुलींना अंगणवाडी व शाळास्तरावर जंतनाशक गोळी देऊन त्यांच्या आरोग्याचा दर्जा उंचावण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी राष्ट्रीय जंतनाशक दिन 10 ऑक्टोबर रोजी मोहिम राबविण्यात येणार आहे. यातंर्गत जिल्ह्यातील 1902 अंगणवाडी केंद्र, 1696 शाळेमध्ये मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत अंगणवाडयांमध्ये नोंद असलेल्या बालकांसह शाळांमधील विद्यार्थी व नोंद नसलेले शाळाबाह्य बालके असे 3,37,651 बालकांना जंतनाशक गोळी देण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. या मोहिमेत सार्वजनिक आरोग्य विभाग, महिला व बालविकास विभाग, शिक्षण विभाग, आदिवासी विभाग यांचा समावेश राहणार आहे. ज्या मुलांनी 10 ऑक्टोबर रोजी जंतनाशक गोळी खाल्ली नसेल त्यांना 17 ऑक्टोबर रोजी गोळी देण्यात येईल, असे प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश सुतार यांनी सांगितले आहे.