देवरी क्षेत्र लम्पी बाधित

गोंदिया 07: पंचायत समिती गोंदिया अंतर्गत देवरी गावात 7 जनावरे लम्पी चर्मरोग सदृष्य लक्षणे आढळून आल्याने जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी देवरी गावाला बाधित क्षेत्र घोषित केले आहे. तसेच या गावाच्या 5 किमी त्रिज्येतील नवेगाव, सोनविहरी, धापेवाडा, लोधीटोला, (धापे) व किन्ही या गावांना सर्तकता क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे.

लम्पी रोगावर नियंत्रण प्रतिबंध व त्याचे निमुर्लन करण्याकरिता जिल्हा प्रशासन सज्ज असून शासनाने दिलेल्या दिशानिर्देशानुसार उपाययोजना करण्यात येत आहे. यादरम्यान देवरी शिवारातील नवेगाव, सोनविहरी, धापेवाडा, लोधीटोला, (धापे) व किन्ही या गावांमध्ये सात जनावरांमध्ये लम्पी सदृश्य लक्षणे आढळल्याने जिल्हा व तालुका प्रशासनाने तातडीने उपाययोजना सुरु केल्या आहेत. बाधित गावातील गोठ्यात व परिसरात सोडियम हायोक्लोराईडची फवारणी आलेली आहे. तसेच सर्तकता क्षेत्रात गोचिड, गोमाश्या डास यांच्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी परजिवीनासक व किटकनाशक औषधाची फवारणी करण्यात येत आहे. पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी, कर्मचारी या गावांत उपाययोजना करीत असून आजारी जनावरांवर निशुल्क उपचार करित आहेत. या गावांमध्ये पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, खाजगी व्हेक्सीनेटर व नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या लसीकरण करण्यात येत आहे. बाधित क्षेत्रात 90 टक्के लसीकरण पूर्ण झालेले आहे. दरम्यान, पशुपालकांना व नागरिकांना सतर्क राहावे व प्रशासनास लम्पी रोगाच्या नियंत्रणासाठी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

लम्पी रोग नियंत्रणसाठी जिल्हा प्रशासनाद्वारे लसीकरणावर भर दिला जात आहे. जिल्ह्यात एकूण 2 लाख 93 हजार 627 गायवर्ग पशुधन असून जिल्ह्याला 1 लाख 90 हजार लम्पी स्कीनकरिता गोट पॉक्सच्या लसमात्रा प्राप्त झाल्या. त्यापैकी आजतागायत 1 लाख 85 हजार लसमात्राचे लसीकरण पशुसंवर्धन विभागाच्या प्रयत्नाने करण्यात आले आहे. जिल्ह्यास पुढील दोन दिवसात 40 हजार लसमात्रा उपलब्ध होणार असून सदर लसीकरणाचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

Print Friendly, PDF & Email
Share