गोंदिया जिल्हातील धान घोटाळा प्रकरणी 88 संस्थांना दंड

43 लक्ष रुपयाची होणार वसुली

गोंदिया18: रब्बी हंगामातील हमी भाव धान खरेदी केंद्रांनी 7 जुलै रोजी तासाभरात विक्रमी धान खरेदी केली होती. त्याची कशी केली असता संस्थांनी बोगस धान खरेदी केल्याचे उघड झाले होते. त्यातील 38 संस्थांना प्रत्येकी 1 लाख, तर 50 संस्थांना प्रत्येकी 10 हजार रुपये अशा एकूण 88 संस्थांवर एकूण 43 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

यावर्षी रबी हंगामात हमी भाव धान खरेदी केंद्रांवर मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली. शेतकर्‍यांकडील धान खरेदी न करता व्यापार्‍यांकडील धान खरेदी करण्यात आले होते. शासनाने शेतकर्‍यांकडील धानाची खरेदी व्हावी, याकरिता तीनवेळा मुदतवाढ दिली होती. असे असताना देखील अद्यापही अनेक शेतकर्‍यांकडील धान खरेदी झाले नसल्याचे वास्तव आहे. 7 जुलै रोजी जिल्ह्यातील 90 पेक्षा जास्त केंद्रांवर तासाभरात 7 लाख क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली होती . त्यामुळे हा घोळ समोर आला.

राजकीय पक्ष आणि शेतकर्‍यांनी आरडाओरड केल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी अशा केंद्रांची चौकशी केली. तीन वेगवेगळ्या पथकांमार्फत करण्यात आलेल्या चौकशीत घोळ समोर आला होता. चौकशी अहवाल आल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी त्या संस्थांवर दंडात्मक कारवाई केली. जास्त घोळ असलेल्या 38 संस्थांना प्रत्येकी 1 लाख असे एकूण 38 लाख रुपये तर 50 संस्थांना प्रत्येकी 10 हजार असे एकूण 5 लाख रुपयांचा दंड ठोठावला. याचसह त्या संस्थांना यापुढे असा प्रकार न करण्याची ताकीद देखील देण्यात आली आहे.

तर संस्था काळ्या यादीत 

चौकशीत ज्या संस्था दोषी आढळून आल्या, त्या संस्थांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यापुढे पुन्हा अशी चूक केल्यास संस्था काळ्या यादीत टाकण्यात येणार आहेत. मात्र या संस्था यापुढे सुधारतील काय ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Print Friendly, PDF & Email
Share