गोंदिया जिल्हातील कमी पटसंख्येच्या 51 शाळा गोत्यात

◼️देवरी तालुक्यात सर्वाधिक 15 शाळांचा समावेश

देवरी 16 : आदिवासी, जंगलव्याप्त, नक्षल प्रभावित जिल्हा म्हणून गोंदिया जिल्ह्याची ओळख आहे. जिल्हात रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या शहरांत स्थलांतर करु लागले आहेत. अनेक कुटुंब आपल्या मुलांसह शहरात रोजगारासाठी स्थलांतरीत होत असल्याने येथील शाळांमध्येही विद्यार्थी पटसंख्या दिवसेंदिवस घटत आहे. याचेच परिणाम म्हणून जिल्ह्यातील 51 कमी पटसंख्येच्या शाळा संकटात आल्याचे चित्र समोर आले आहे.

राज्य सरकारने 10 विद्यार्थ्यांपेक्षा कमी पटसंख्या असणार्‍या शाळा बंद करण्याचे प्रयत्न आर्थिक भार सोसवत नसल्याचे कारण सांगून सुरु केले आहेत. अशा शाळा बंद करून विद्यार्थ्यांचे जवळच्या अन्य शाळांमध्ये समायोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. परंतु दुर्गम, डोंगराळ, नक्षलग्रस्त भागात राहणार्‍या अनेक वाड्यावस्त्यांना जोडण्यासाठी रस्ते नसल्याने या मुलांना नदीनाले, जंगलातून अवघड मार्गाने प्रवास करावा लागतो. परिणामी ग्रामीण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य संकटात सापडले आहे. दुर्गम भागातील या शाळांमध्ये मुलांना शिकवणारे शिक्षक हे शहरात राहतात, त्यांना कर्तव्यावर येण्याजाण्यात अनेक अडचणी येतात.

गोंदिया जिल्ह्यात पहिली ते आठवीपर्यंतच्या 1039 प्राथमिक शाळा आहेत. यातील 51 शाळा पटसंख्येअभावी अडचणीत आहेत. यात 39 जिल्हा परिषदेच्या, 2 नगर पालिकेच्या तर 8 खाजगी शाळांचा समावेश आहे. पटसंख्या वाढविण्यासाठी मुलांना शोधून आणावे लागत आहे. शैक्षणिक साहित्य मुबलक पुरवूनही मुलांची शैक्षणिक प्रगती होत नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे. इतक्या शैक्षणिक सुविधा पुरवूनही शाळेत शिक्षक येत नसल्याने मुलांचे शैक्षणिक भवितव्य अंधारमय असल्याचे सांगत एका पाठोपाठ एक कुटुंब स्थलांतरीत होत असल्याने येथील शाळा ओस पडू लागल्या आहेत.

सर्वोत्तम व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा प्रयत्न – शिक्षणाधिकारी

तूर्तास तरी दहापेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचे शासनाचे पत्र आलेले नाही. गावची शाळा सुरु ठेवण्याची जबाबदारी स्थानिक पदाधिकार्‍यांसह पालकांचीही आहे. या शाळा सुरू ठेवण्यासाठी त्यांनीही तितक्याच सकारात्मक दृष्टीकोनातून विचार करणे गरजेचे आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमधून सर्वोत्तम व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा प्रयत्न असल्याचे प्राथमिकचे शिक्षणाधिकारी महेंद्र गजभिये म्हणाले. 

तालुकानिहाय 10 पेक्षा कमी पटसंख्या शाळा व विद्यार्थी

तालुका           शाळा         विद्यार्थी

अर्जुनी मोर.       2                 18

आमगाव           6                 51

देवरी 15 107

गोंदिया             7                 55

गोरेगाव            8                 49

सालेकसा         4                 33

सडक अर्जुनी    3                 26

तिरोडा 4 26

एकूण 51 365

Share