गोंदिया जिल्ह्यातील देवरी, अर्जुनी मोर तालुक्यात अतिवृष्टी

देवरी तालुक्यात 72.4 मिमी पाऊस

गोंदिया: जिल्ह्यात काल, 11 सप्टेंबरपासून पावसाची संततधार सुरु असून सकाळपर्यंत 43.7 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. दरम्यान आज दिवसभर पावसाची रिपरिप सुरु होती. रविवारी रात्री अर्जुनी मोरगाव व देवरी तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाल्याने इटियाडोह धरण ओव्हरफ्लो झाले आहे. परिणामी, अर्जुनी मोरगाव तालुक्यात अनेक लहान नाल्याना पूर आल्याने रस्ते बंद होते. अनेक शाळांमध्ये पाणी असून अर्जुनी येथील शाळांना आज सुट्टी देण्यात आली होती. तसेच सिरपूर धरणाचे सात दरवाजे उघडण्यात आले असून नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

जिल्ह्यातील धरण क्षेत्रात रविवारपासून जोरदार पाऊस सुरु असल्याने धरणाच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. देवरी तालुक्यात 72.4 मिमी पाऊस झाला असून सिरपूरबांध धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने या धरणाचे 7 दरवाजे सोमवारी सकाळी 9 वाजता उघडण्यात आले. यामधून 180.34 क्युमेक (6370 क्युसेक) विसर्ग नदी पात्रात सोडण्यात आला आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यात सोमवारी रात्री दमदार पर्जन्यवृष्टी झाली. तालुक्यात 130.8 मिमी पावसाची नोंद झाली असून इटियाडोह धरणाच्या कालव्यावरून पाणी वाहून जात असल्याने अर्जुनीच्या माता माऊली मंदिर परिसरात पाणीच पाणी होते. अतिवृष्वृटीमुळे अनेक नाल्यांना पूर असल्याने व शाळांच्या पटांगणात पाणी साचल्याने सोमवारी अर्जुनी मोरगाव नगरीतील शाळांना सुट्टी देण्यात आली. मोरगाव, ताडगाव रस्त्यावर सर्वत्र पाणीच पाणी होते. निलज नजीकच्या नाल्यावरून पाणी वाहत होते. सिरोली गावात इटियाडोह धरणाच्या कालव्यातून पाणी शिरल्याने ग्रामस्थांची तारांबळ उडाली. तसेच बरडटोली, धमदीटोला, अरततोडी, जरुघाटा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पटांगणात गुडघाभर पाणी साचलेले होते.

Print Friendly, PDF & Email
Share