देवरीचे नगरसेवक संजय दरवडे यांचे घरी ‘ब्रह्मकमळ’ बहरला , जाणून घ्या ‘ब्रम्हकमळ’ वनस्पती बद्दल
डॉ. सुजित टेटे
देवरी 02: भारतात ‘डचमन्स पाईप कॅक्टस’ या निवडुंग वनस्पतीला अज्ञानवश ‘ब्रह्मकमळ’ असे संबोधले जाते. मुळात या दोन्ही वनस्पती भिन्न भिन्न असून यांची कुळे पण वेगवेगळी आहेत. सूर्यफुलाच्या कुळातील हे फूल असून जुलै-ऑगस्टमध्ये या ब्रह्मकमळाचा बहर असतो. सध्या देवरी नगर पंचायतीचे सभापती संजय दरवडे यांच्या रोप वाटिकेत ब्रम्हकमळ बहरला असून चाहते या वनस्पती आणि फुलाला बघण्यासाठी उत्सुक दिसले.
‘फुलांच्या दरीत’ (व्हॅली ऑफ फ्लाॅवर्समध्ये) आणि उत्तराखंडातील हेमकुंड साहेब येथे हे ब्रह्मकमळ जूनच्या शेवटच्या आठवड्यात हजेरी लावते. या फुलाचे वरचे टोक जांभळ्या रंगाचे असून पाकळ्या हिरव्या-पिवळ्या कागदी प्रदल मंडलात गुंडाळल्यासारख्या दिसतात.
डचमंस पाईप कॅक्टस किंवा क्वीन ऑफ नाईट ही एक निवडुंग वर्गीय वनस्पती असून तिचे शास्त्रीय नाव Epiphyllum oxypetalum असे आहे. भारतात बहुतेक वेळा या वनस्पतीला अज्ञानवश ब्रह्मकमळ असे म्हणतात. पांढऱ्या रंगाची, सुमारे ४ ते १२ इंच लांबीची ही फुले जुलै महिन्याच्या अखेरीस वा ऑगस्ट महिन्यात उमलतात. ज्या दिवशी उमलतात त्या दिवशी पाऊस थांबलेला असतो. कळी मोठी होताच सायंकाळी उमलण्याची प्रक्रिया सुरू होऊन मध्यरात्रीपर्यंत फूल पूर्ण उमलले जाते. फुलांचा पांढरा रंग व मध्यरात्रीचे उमलणे यापाठी कीटकांना परागसिंचनासाठी आकर्षित करण्याचा हेतू असतो. या वनस्पतीला वाढीसाठी भरपूर उन्हाची आवश्यकता असते. या वनस्पतीची लागवड पाने कुंडीत लावून करता येते. सध्या दुर्मिळ होत चाललेले हे फूल वाचवण्यासाठी या ब्रह्मकमळाच्या रोपाला संरक्षित रोपाचा दर्जा देण्यात आला आहे.