विघ्नकर्त्या बाप्पाचे जल्लोषात स्वागत, 404 गावात ‘एक गाव, एक गणपती’
प्रा. डॉ .सुजित टेटे @प्रहार टाईम्स
देवरी सह ग्रामीण भागातही जल्लोष
देवरी 01: नैसर्गिक विविधतेने नटलेल्या तालुक्यात मांगल्य, पावित्र्य आणि उत्साहाचे प्रतीक असलेल्या विघ्नहर्त्या गणरायाचे भक्तीभावात, आनंदात व जल्लोषात आगमन झाले असून सार्वजनिक मंडळासह व प्रत्येक घरात विधीवत पूजा, अर्चना करुन मूर्तीची स्थापना करण्यात आली.
कोरोना संसर्गाचे निर्बंध शिथिल केल्यामुळे सण, उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जात आहे. गणरायाच्या आगमनाची मागील 10 दिवसापासून तालुक्यात उत्साहात तयारी सुरु होती. घरोघरी तसेच सार्वजनिक गणेश मंडळात श्रीमूर्तीचे भक्तीभावाने पुजन करुन स्थापना करण्यात आली. लहानापासून जेष्ठापर्यंत या उत्सवाचा उत्साह दिसून आाला. गणेश चौक , मस्कऱ्या चौक , पोलीस वसाहत देवरीच्या विविध चौकात बाप्पांना आपल्या घरी व मंडळाच्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी सर्वांनी अगदी नाचत व वाजत गाजत जल्लोष साजरा केला. बाप्पाचा 10 दिवसाचा मुक्काम राहणार असून, या दरम्यान गणेश मंडळांनी सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवादरम्यान तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिस विभागही सज्ज झाले आहे.
404 गावात ‘एक गाव, एक गणपती’
‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना जिल्ह्यातही जपली जात आहे. यावर्षी 404 गावात एक गाव एक गणपती ही संकल्पना राबविली जात आहे. यामध्ये गोंदिया पोलिस ठाण्यातंर्गत 2, गोंदिया ग्रामीण 22, रावणवाडी 31, तिरोडा 39, गंगाझरी 18, दवनीवाडा 9, आमगाव 29, गोरेगाव 31, सालेकसा 16, देवरी 34, चिचगड 46, डुग्गीपार 44, नवेगावबांध 22, अर्जुनी मोर 39 व केशोरी पोलिस ठाण्यातंर्गत 22 गावात -एक गाव, एक गणपती’ बसविण्यात येणार आहे.