स्थलांतरित मजुरांना मिळणार योजनेचा लाभ
गोंदियाः ‘वन नेशन वन रेशनकार्ड’ अंतर्गत रेशन पोर्टेबिलिटीमुळे कुठल्याही भागातील रेशनकार्डधारकांना कोणत्याही भागातील रेशन दुकानामधून धान्य घेता येते. आजवर प्रत्येक स्वस्त धान्य दुकानाला त्यांच्या नोंदणीकृत कार्डधारकांसाठीचाच धान्य कोटा मिळत होता. १ एप्रिलपासून कोट्याचे निर्बंध हटणार आहेत. त्यामुळे दुकानदारांना मागणीनुसार अतिरिक्त धान्यसाठा उपलब्ध होऊन लाभार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. केंद्र शासनाने ही योजना याआधीच सुरू केली आहे.
या योजनेचा लाभ आतापर्यंत जिल्ह्यात स्थलांतरित मजुरांनी घेतला आहे. मात्र, आता दुकानदारांनाही कोटा वाढवून दिला जाणार आहे. कामाच्या शोधात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतर करणाऱ्या ऊसतोड कामगार, बांधकाम मजूर आणि
इतर हंगामी कामगारांसाठी ही योजना वरदान ठरणार आहे. त्यांना आता रेशनसाठी गावी जाण्याची गरज भासणार नाही. रेशनकार्ड आधारशी लिंक असणे आवश्यक आहे. स्वस्त धान्य दुकानातील ई-पॉस मशीनवर आधार प्रमाणीकरण करून बोटाचा ठसा किवा ओटीपीद्वारे ओळख पडताळणी केली जाते. त्यानंतर तत्काळ धान्य वितरण केले जाणार आहे. पोर्टेबिलिटी सुविधा असूनही दुकानदारांकडे अतिरिक्त धान्य साठा नसायचा.
रेशनसाठा वाढणार:
बाहेरून आलेल्या कार्डधारकांना धान्य दिल्यास स्थानिक कार्डधारकांचे धान्य कमी पडायची भीती दुकानदारांना वाटत होती. नवीन नियमानुसार, ज्या दुकानांमध्ये पोर्टेबिलिटीचा वापर करून धान्य घेणाऱ्यांची संख्या जास्त आहे, त्या दुकानदारांनी मागणी नोंदवल्यास त्यांना अतिरिक्त धान्य कोटा त्वरित मंजूर केला जाईल. यामुळे ‘स्टॉक संपला’ असे कारण सांगून लाभार्थ्यांना नाकारता येणार नाही. शासनाच्या योजनेनुसार कोणत्याही राज्यातील किंवा पात्र लाभार्थी त्याच्या रेशनकार्डचा वापर करून जवळच्या कोणत्याही रेशन दुकानात जाऊन ई-पॉस मशीनवर अंगठा लावून धान्य घेऊ शकतो.








