१ किमी. अंतराची अटही केली रद्द, यंदा आहेत १०४२ जागा
गोंदिया : खासगी शाळांमध्ये आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) राखीव असलेल्या २५ टक्के जागांवरील प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी प्रक्रियेसाठी १ किमी. अंतराची अट रद्द करण्यात आली असतानाच आता प्रवेशासाठी १८ मार्चपर्यंत मुदतवाढही देण्यात आली आहे. यंदा जिल्ह्यात १२५ शाळांमध्ये १०४२ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. त्यात आता मुदतवाढ मिळाल्याने पालकांनी लवकरात लवकर अर्ज करणे गरजेचे आहे.
आरटीई प्रवेश प्रक्रियेद्वारे आर्थिक दुर्बल घटकांतील मुलांना नामांकित खासगी शाळांमध्ये मोफत प्रवेश दिला जातो. या विद्यार्थ्यांचे शुल्क सरकारकडून संबंधित शाळांना प्रतिपूर्ती स्वरूपात दिले जाते. त्यामुळे दरवर्षी या प्रवेश प्रक्रियेला पालकांचा मोठा प्रतिसाद मिळतो. यंदा जिल्ह्यातील १२५ शाळांत मोफत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यासाठी १७ फेब्रुवारीपासून ऑनलाइन प्रवेश अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली होती. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी १० मार्च ही शेवटची मुदत देण्यात आली होती. मात्र, सुरुवातीपासूनच आरटीई प्रवेशाचे पोर्टल संथगतीने काम करत असल्याने असंख्य पालकांना आपल्या पाल्याचे अर्ज भरता आले नाहीत. ही बाब लक्षात घेत प्रवेश प्रक्रियेला आता १८ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
समग्र शिक्षा अभियानाचा कारभार विस्कळीत
समग्र शिक्षा संघर्ष समितीच्या वतीने कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत कायम करा, या मागणीसाठी लढा सुरू आहे. यांतर्गत समितीच्या वतीने ९ मार्चपासून मुंबई येथे बेमुदत आमरण उपोषण व अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील कर्मचारीही सहभागी झाले आहेत. परिणामी समग्र शिक्षा अभियानचा कारभार चंगलाच विस्कळीत झाला आहे.








