भरारी पथकांची धडक कारवाई कावराबांध केंद्रावरील प्रकार
सालेकसा : जिल्ह्यासह तालुक्यात दहावीची परीक्षा सुरळीत सुरू आहे. अशात काल (ता. १३) जिल्हा परिषद हायस्कूल कावराबांध येथील केंद्रावर विज्ञान विषयाचा पेपर सुरू असताना भरारी पथकाने परीक्षा केंद्रावर धडक दिली. दरम्यान पथकाला तीन बोगस विद्यार्थी आढळून आले. या प्रकाराने तालुक्यात एकच खळबळ उडाली. तीनही बोगस विद्यार्थी हे मध्यप्रदेश राज्यातील लांजी तालुक्यातील कारंजा येथील राहणारे आहेत. केंद्र संचालक ए. एस. कोरे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. वैभव सदानंद मटाले, समीर धर्मराज मटाले आणि मयंक ठमकलाल बनोठे तिघे रा. मुक्काम कारंजा ता. लांजी (मप्र) असे बोगस परीक्षार्थीची नावे आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीची परीक्षा घेतली जात आहे. परीक्षा अंतिम टप्प्यात आली आहे. जिल्हा शिक्षण विभागाच्या वतीने कॉपीमुक्त वातावरणातपरीक्षा पार पडावी, याकरीता अनेक उपाययोजना केल्या आहेत. यानुरूप जिल्ह्यासह तालुक्यात दहावीची परीक्षा सुरळीत सुरू असल्याचे दिसून आले. त्यातच काल (ता. १३) विज्ञान-२ विषयाचा पेपर होता. परीक्षा केंद्र क्रमांक २१७७ जि. प. हास्कूल व ज्युनीयर कॉलेज कावराबांध येथे खोली क्र. ०२ मधील रोल नंबर जे-१४८९८९ चा विद्यार्थी नामे सुमीत
जयचंद चौधरी च्या ठिकाणी वैभव सदानंद मटाले (१५) रा. कारंजा, ता. लांजी (मप्र), खोली क्र. १७ मधील रोल नंबर जे-१४९०१३ चा विद्यार्थी नामे वैध्यच्या ठिकाणी मयंक ठमकलाल बनोठे (१५) रा. बापडी, ता. लांजी (मप्र) आणि खोली क्र. २३ मधील रोल नंबर जे-१४८९७१ चा विद्यार्थी नामे भोंडेकरच्या ठिकाणी समीर धर्मराज मटाले (१५) रा. कारंजा, ता. लांजी (मप्र) असे तीन बोगस विद्यार्थी परिक्षेचे हॉल टिकट स्वतःकडे बाळगून नमूद रोल नंबरच्या ठिकाणी बसून ते स्वतः परिक्षेचे विद्यार्थी असल्याचे परिक्षा कक्ष पर्यवेक्षक यांना भाषवून विज्ञान-२ विषयाचा पेपर सोडविताना आढळले. हा प्रकार निदर्शनास येताच एकच खळबळ उडाली. यामुळे केंद्रावरील अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला. या प्रकरणी केंद्र संचालक ए. एस. कोरे यांच्या तक्रारीवरून सालेकसा पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांनी बोगस विद्यार्थ्यांना ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. पुढील तपास पोनि भुषण बुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि चव्हाण करीत आहेत.
केंद्र संचालक व मुख्याध्यापकाच्या कृतीवर आश्चर्य?
दहावी बोर्डाची परीक्षा सुरू असताना ज्या विद्यार्थ्यांच्या नावाने परीक्षा देण्यासाठी प्रवेश पत्र आले होते. ते विद्यार्थी परीक्षा न देता त्यांच्या नावावर इतर बोगस विद्यार्थी परीक्षा देत असल्याचे उघड झाले. हे बोगस विद्यार्थी विज्ञान विषयाच्या पहिल्या पेपरला अनुपस्थित होते मात्र दुसऱ्या पेपरला परीक्षा देण्यासाठी केंद्रावर उपस्थित झाले. अशात या परीक्षा केंद्रावर आणखी किती बोगस विद्यार्थी परीक्षा देत असावेत याबद्दल शंका निर्माण झाली. तर दुसरीकडे लापरवाही बाळगत असलेले केंद्र संचालक आनंद कोरे आणि मुख्याध्यापक एच. पी. दराडे यांची कार्यप्रणालीही चर्चेत आली आहे. बोगस विद्यार्थी परीक्षा देत असल्याची माहिती केंद्र संचालक व मुख्याध्यापकाला नसणे, यावरही खमंग चर्चा रंगली आहे.
विशेष म्हणजे, जिल्हा परिषद हायस्कूल काबराबांध येथे दरवर्षी दुसऱ्याराज्यातील दूरदूरचे विद्यार्थी बोगसरीत्या भरती करून तुकड्या चालवण्याचे प्रकार सुरू आहेत. यापैकी बरेच विद्यार्थी वर्ष भर शाळेत हजेरी लावत नाही. परंतु शाळेच्या नोंदवहीवर हजेरी दाखवली जाते. यातील अनेक विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी सुद्धा पोहोचत नाही. अशावेळी येथील काही शिक्षक मिलीभगत करून बोगस विद्यार्थी परीक्षेला बसवून आपले चांगभलं करीत असल्याची चर्चा पालकांमध्ये आहे.








