महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या 107 कुशल कामांचे 157 कोटी अडले
देवरी: तालुक्यात 2017-18 या वर्षात विविध गावांमध्ये महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून 107 कामे करण्यात आली. परंतु या कामांचे 157 कोटी रुपये अडून आहेत. देवरी पंचायत समितीकडून आता या कामांचे देयक मिळण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मनरेगा व उपजिल्हाधिकार्यांकडे रोहयोच्या 157 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे काम ग्रामपंचायत स्तरावर घेण्यात आले. तालुक्यातील उचेपूर, पिपरखारी, पुराडा, आमगाव, बोरगाव बाजार, पिंडकेपार, डवकी, ढिवरीनटोला, भागी, डोंगरगाव, जेठभावडा, सर्रेगाव या गावांत 107 कामे करण्यात आली होती. काम पूर्ण झाल्यावर अनेक अधिकार्यांनी या कामांना भेट देऊन कामांची पाहणी केली. काम समाधानकारक असल्याचे म्हणाले. परंतु निधीअभावी या कामांचे देयक देण्यात आले नाही. ही कामे करणार्या कंत्राटदार व ग्रामपंचायत एजेंसीने उसणवारीवर साहित्य आणू कामे केले होते. परंतु वेळेवर देयके न मिळाल्यामुळे त्यांनी कर्जाने पैसे घेऊन त्या कामासाठी आणलेल्या साहित्याचे पैसे दिले. त्यामुळे आता त्या काम करणार्या यंत्रणेवर आर्थिक भार पडत आहे. केलेल्या कामाचे देयक त्वरीत देण्यात यावे, अशी मागणी होत आहे.