जिल्हातील 716 शाळांत शुद्ध पिण्याचे पाणी नाही
गोंदिया: सरकारी शाळेचे नाव घेताच भौतिक सुविधांची समस्या डोळ्यासमोर येते. गोंदिया जिल्हा परिषदेच्या शाळाही याला अपवाद नाहीत. जिल्हा परिषदेच्या 1 हजार 39 शाळांपैकी 373 शाळांमध्येच विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या शुद्ध पाण्याची सुविधा उपलब्ध आहे. तर काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना विहीर, नळ व विंधनविहीराच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. उल्लेखनीय म्हणजे शासनाचा पुरस्कार मिळालेली काही शाळांमध्येही विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावे लागत असल्याचे चित्र आहे
एकीकडे शाळा डिजिटल करण्याचे प्रयत्न केले जात आहे. तर दुसरीकडे विद्यार्थ्यांना साधे पिण्याचे पाणी देाील मिळत नाही. अशी अवस्था जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांची आहे. जिल्ह्यामध्ये जिप प्राथमिक विभागाच्या इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत 1 हजार 39 शाळा सुरु आहेत. या शाळांमध्ये दीड लाखांपेक्षा जास्त गरीब व सामान्य कुटूंबातील मुले शिक्षण घेत आहे. समग्र शिक्षण अभियानातंर्गत विद्यार्थ्यांना दुपारचे जेवन दिले जाते. मात्र जेवनासोबत पिण्याच्या शुद्ध पाण्याची सोय उपलब्ध करुन देण्यास प्रशासन अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यातील 373 शाळांमध्ये पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था आहेत. तर 716 शाळांमध्ये शुद्ध पेयजलाची बोंब असल्याचे दिसून येते. त्यामुळे विद्यार्थ्यांना अशुद्ध पिण्याचा पाणी प्यावे लागत असून त्यांच्या आरोग्याचा प्रश्न समोर आहे. विशेष म्हणजे, शिक्षणावर ग्रामपंचायतींना वित्त आयोगाकडून मिळालेल्या निधीतून 5 टक्के खर्च करण्याचे अधिकार दिले आहे. या निधीतून संबधित ग्रामपंचायतींनी व जिल्हा परिषदेने शुद्ध पाण्याची व्यवस्था केल्यास अनेक शाळांतील पिण्याच्या शुद्ध पाण्याची समस्या मार्गी लागू शकेल, अशी मागणी पालकांकडून होत आहे.