तीन वर्षापासून सिंचन विहीर योजना लाभार्थी अनुदानाच्या प्रतीक्षेत
◼️देवरी तालुक्यात सर्वाधिक 160 प्रस्ताव
गोंदिया: शासनामार्फत धडक सिंचन विहीर योजना राबविण्यात आली. शेतकर्यांनी विहिरींचे बांधकाम पुर्ण केले. आजही अनेक लाभार्थी शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. शेतकरी सिंचनाच्या बाबतीत आत्मनिर्भर व्हावा, त्यांच्या हाती भरघोष उत्पन्न पडावे या उद्देशाने तीन वर्षापुर्वी राज्यातील तत्कालीन फडणवीस सरकारनेे धडक सिंचन विहीर योजना राबविली.
योजनेंतर्गत वर्ष 2019 मध्ये जिल्ह्यातील 1100 प्रकरणांना मंजुरी प्रदान केली. त्यापैकी 541 लाभाथ्यांनी विहीर बांधकाम पुर्ण केले. परंतु ही योजना लाभार्थी शेतकर्यांना मृगजळ ठरण्यापेक्षा डोकेदुखी वाढवणारीच ठरली आहे. जिल्ह्यात योजनेंतर्गत गोरेगाव तालुक्यात 150, गोंदिया 110, तिरोडा 150, आमगाव 110, सडक अर्जुनी 140, देवरी 160, अर्जुनी मोर 140 आणि सालेकसा तालुक्यातील 140 विहिरींच्या प्रस्तावांचा समावेश होता. त्याकरिता 27 कोटी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. 541 शेतकर्यांनी बांधकाम पूर्ण केले. मंजूर निधीपैकी आघाडी सरकाने केवळ 2 कोटी रुपयांचाच निधी शासनाने दिला. लाभार्थ्यांनी खर्च केलेली रक्कमही त्यांना देण्यात आली नाही. अनुदान मिळावा म्हणून लाभार्थी शेतकर्यांनी अधिकारी, जनप्रतिनिधींकडे वारंवार पाठपुरावा केला. दरम्यान कोरोना संसर्गाचे कारण सांगून निधी मिळण्यास विलंब होत असल्याचे सांगण्यात आले. शासन लवकरच निधी देईल, या अपेक्षेने बांधकाम पूर्ण केले. परंतु, तीन वर्ष लोटून देखील निधी मिळाला नाही. आता पुन्हा राज्यात शिंदे गट व भाजपाची सत्ता स्थापन झाली आहे. ही योजना तत्कालीन फडणवीस सरकारची होती. आतातरी सरकार बायबाप निधी देईल अशी अपेक्षा लाभार्थी बाळगून आहेत.