गणेश मंडळांनी सामाजिक उपक्रम राबवावे- अशोक बनकर

तालुक्यात डीजे मुक्त गणेशोत्सव साजरा होणार

देवरी 29:- यावर्षी सर्व गणेशमंडळांनी गणेशोत्सव काळात सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक सलोखा जपण्यासाठी कार्य करीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, आवाहन गोंदियाचे अप्पर पोलिस अधीक्षक अशोक बनकर यांनी केले आहे.
ते देवरी येथील पोलिस स्टेशनमध्ये आज (दिं.29) रोजी आयोजित शांतता बैठकीत उपस्थित गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी देवरीचे ठाणेदार रेवचंद सिंगनजुडे हेही उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ठाणेदार सिंगनजुडे म्हणाले की, सर्व गणेश मंडळांनी कायद्याचे पालन करावे. या उत्सवात होणाऱ्या खर्चात काटकसर करून त्या पैशाचा उपयोग लोकोपयोगी कार्यात करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी बोलताना केले. याशिवाय या कालावधीत डीजेचा वापर टाळण्यासंदर्भात प्रस्ताव मांडळा. या प्रस्तावाला उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे आश्वासन दिले. नियमांत शिथिलता दिली असली तरी कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही,याची दक्षता घ्यावी, असे ही सिंगनजुडे म्हणाले.

Share