राज्यातील पोलिसांना दिवाळीत पदोन्नती : उपनिरीक्षक, साहाय्यक निरीक्षकांचा समावेश

प्रतिनिधी / नागपूर : गेल्या काही महिन्यांपासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांना येत्या दिवाळीत पदोन्नती मिळणार आहे. यामध्ये साहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षकांचा समावेश आहे.
गृह मंत्रालयाने नुकतीच राज्यातील १ हजार २१३ पोलीस उपनिरीक्षकांना साहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नतीसाठी निवड यादी जाहीर केली. यापैकी जवळपास ७०० ते ७५० पोलीस उपनिरीक्षकांना साहाय्यक निरीक्षक पदावर पदोन्नती मिळणार आहे.
महिन्याभरात संवर्ग मागवण्यात येणार असून दिवाळीत पोलीस उपनिरीक्षकांना पदोन्नती देण्याचा मानस शिंदे-फडणवीस सरकारचा आहे.त्या अनुषंगाने राज्याच्या पोलीस आस्थापना विभागाला सूचना करण्यात आली आहे. नव्या सरकारने पोलीस विभागासाठी सकारात्मक निर्णय घेण्याचा धडाका लावला असून त्यामध्ये पदोन्नतीचा विषय निकाली काढण्यात येणार असल्याची माहिती आहे.
यासोबतच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्याही बदल्यांना मुहूर्त निघाला असून लवकरच त्यावरही निर्णय होणार आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खातेही असल्यामुळे अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी ‘मध्यस्थी’मार्फत नागपुरातून बदलीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. गणेशोत्सवानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा निर्णय झाला आहे. मात्र, त्यापूर्वीच या बदल्या व्हाव्यात, यासाठी राजकीय दबाव असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुंबई, पुण्यासह मराठवाडय़ातील ‘आयपीएस‘ दर्जाच्या अधिकाऱ्यांना विदर्भात ‘पोिस्टग’ देण्यासाठी हालचाली असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
गृह मंत्रालयाने महिनाभरापूर्वी राज्यभरातील १०१७ साहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची पदोन्नतीसाठी निवड यादी केली होती. गणेशोत्सवानंतर ४०२ साहाय्यक निरीक्षकांना पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती देण्यात येणार आहे. येत्या १५ दिवसांत साहाय्यक पोलीस निरीक्षकांकडून संवर्ग मागवण्यात येणार आहेत. तर, दिवाळीत राज्यातील अनेक अधिकाऱ्यांना पदोन्नती मिळणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

Print Friendly, PDF & Email
Share