महावितरण ने शेतकऱ्यांचे शोषण थांबवावे अन्यथा कुटूंब, पाळीव प्राण्यांसह आंदोलन
देवरी : जिल्ह्यातील नक्षलग्रस्त सालेकसा तालुक्यातील खोलगड येथील शेतकर्यांना महावितरणतर्फे रिडींगनुसार वीजदेयकाऐवजी मागील रिडींगनुसार वाढीव वीजदेयक पाठविण्यात आले. त्यामुळे वीजदेयक चालु रिडिंगनुसार देण्यात यावे, अन्यथा कुटूंब व पाळीव प्राण्यांसह आंदोलन करण्याचा इशारा खोलगडवासींनी आज, 25 ऑगस्ट रोजी निवेदनातून महावितरणला दिला आहे.
उन्हाळा संपलेला असून पावसाळा सुरु आहे. परिणामी विजेचा वापर कमी झालेला असतानाही महावितरणने खोलगड येथील शेतकर्यांना मागील रिडींगप्रमाणे 10 ते 40 हजार रुपयांचे वाढीव वीजदेयक पाठविले आहे. याबाबत संबंधित कर्मचार्यांद्वारे विचारणा केली असता मीटर नादुरुस्त किंवा रिडींग दिसत नसल्याने मागील रिडींगनुसार वीजदेयक पाठविल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हे वाढीव वीजदेयक भरायचे की शेती, कुटूंबाचे पालनपोषण करायचे हा प्रश्न आहे. हा प्रकार म्हणजे वीज वापरकर्त्या शेतकर्यांवर अन्याय असून महावितरणने तातडीने चालू रिडींगनुसार वीजदेयक द्यावे व न्याय द्यावा, अन्यथा कुटूंब व पाळीव प्राण्यांसह आंदोलन करण्याचा इशारा महावितरणला दिला आहे. निवेदन देताना माजी जिप सदस्य राजेश चांदेवर, पुष्पाकला मोहरे, संतोष रहांगडाले आदी पीडित महिला व पुरुष शेतकरी उपस्थित होते.