पोळा :सर्जा-राजाच्या साजश्रृंगाराला महागाईची टोचणी

◼️पोळा सणाला सुद्धा महागाईचे ग्रहण

देवरी 26 : कधी ओल्या, कधी कोरड्या दुष्काळाच्या चक्रात अडकलेला शेतकरी पुन्हा पुन्हा उद्वस्त झाल्यानंतरही मनात जगण्याची उमेद ठेवून प्रत्येक हंगाम साजरा करतो. नुकत्याच झालेल्या संततधार पावसाने अख्खा खरीप हंगाम गोत्यात आला असल्याने अजूनपर्यंत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नसतानाही शेतकरी आज पुन्हा सर्जाराजाच्या सजावटीला सामोरा जात आहे. मनातील दुःखाला विसरून भावनांना सतत हिरवळ देणारा शेतकरी राजा प्रत्येक संकटाला मातीत पुरुन टाकतो. त्याला कष्टाची साथ देणाऱ्या सर्जाराजाची तो पोळा साजरा करण्यास सज्ज झालेला आहे.

पूर्वीच्या काळात गावातील प्रत्येक शेतकऱ्यांकडे बैलजोडी होती. परंतू गेल्या दहा-पंधरा वर्षाच्या काळात मोठ्या प्रमाणात गोधन मोठ्या प्रमाणात नामशेष होत चालले असून कृषी संस्कृतीच्या मुळावरच घाव घालत आहे. गोधन संपत असल्याने बैलांची संख्या कमी झाली आहे. १५-२० हजार लोकवस्तीच्या गावात बैलजोडीची संख्या बोटांवर मोजण्याइतकी झाली आहे. यांत्रिकीकरणामुळे शेतीचे कामे सुलभ झाले असले तरी मुक्या जीवाविषयीची कृतज्ञता आटणार तर नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

महागाईमुळे बाजारपेठेत शुकशुकाट :

मागील वर्षाच्या तुलनेत सजावटीच्या साहित्यात दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झालेली आहे. कोरोना व अतिवृष्टी लक्षात घेता शेतकरी ज्या प्रमाणात सजावटीचे साहित्य घेण्यास यायला पाहिजे त्याप्रमाणात शेतकरी आले नसल्याने दुकानदार त्यांची वाट बघतोय. येसन, बाशिंग, घुंगरू, माळ, झूल, मटाट्या, दोर, कासरे, कवडीच्या माळा, शिंगांना लावणारे रंग आदी साहित्य मोठ्या प्रमाणात महाग झाल्याने शेतकरी वर्गामध्ये चर्चेचा उधाण आला आहे.

Share