अशोक गेहलोत यांनी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपद स्वीकारावे सोनिया गांधींची इच्छा
अहमदाबाद – कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी ज्येष्ठ कॉंग्रेस नेते अशोक गेहलोत यांना पक्षाध्यक्षपदाची संधी देऊ केली असल्याचे वृत्त आहे. त्या विषयी आज येथे पत्रकारांनी गेहलोत यांना बोलते करण्याचा प्रयत्न केला असता ते म्हणाले की, अशी ऑफर देण्यात आल्याचे मला प्रसारमाध्यमांमधूनच समजले. मी पक्षाकडून दिली जाणारी जबाबदारी पूर्ण करण्याचे काम करीत असतो.
याखेरीज मला नेमके अजून काहीही कळलेले नाही. राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिला तर अशोक गहलोत यांनी हे पद सांभाळावे, अशी सोनिया गांधी यांची इच्छा आहे. आणि ही बाब त्यांनी पक्षाच्या नेत्यांपुढे मांडली असल्याचे वृत्त काही ठिकाणी प्रकाशित झाले आहे. सोनिया गांधी यांनी प्रकृतीच्या कारणास्तव अध्यक्षपदापासून आपल्याला आता दूर ठेवावे अशी इच्छा व्यक्त केली असल्याचेही या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. कॉंग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक आता कोणत्याही दिवशी होऊ शकते.
येत्या रविवारी पक्षाध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत निश्चित केला जाणार आहे. राहुल गांधी हे अजूनही पक्षाध्यक्षपद स्वीकारण्यास तयार नाहीत, असे वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर अशोक गहलोत यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. तथापि, काही दिवसांपुर्वी अशोक गहलोत यांनी कॉंग्रेसला पुन्हा बळकट करायची असेल तर राहुल गांधी यांनीच पक्षाध्यक्षपद स्वीकारले पाहिजे अन्यथा पक्षाचे नेते घरी बसतील ते पक्षाला परवडणारे नाही, असे म्हटले होते.