गोंदियातील जलाशयांमध्ये 99.64 टक्के साठा
गोंदिया: जिल्ह्यात यंदा कमी कालावधीत दमदार पाऊस झाला. जिल्ह्यातील जलाशयाची पातळी वाढविण्यासाठी तो पुरक ठरला. जिल्ह्यातील मध्यम, लघु व जुने मालगुजारी अशी एकूण 65 जलाशये शंभर भरली आहेत तर 5 जलाशयांमध्ये 71 ते 97 टक्के साठा आहे. राज्य शासनाच्या लघुपाटबंधारे विभागाच्या अख्त्यारीतील 70 पैकी 65 प्रकल्प ओसंडून वाहू लागले आहेत. त्यामुळे यंदाच्या दमदार पावसाने जलाशयाची पातळी वाढून उन्हाळ्यातील जलसंकट टळल्याचे बोलल्या जात आहे.
तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यामध्ये राज्य शासनाच्या लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत 9 मध्यम, 23 लघु आणि 38 जुने मालगुजारी तलाव आहेत. याशिवाय स्वतंत्र चार मोठे प्रकल्प आहेत. लघु पाटबंधारे विभागाच्या जलाशयांची 205.493 दश लक्ष घन मीटर जलसाठ्याची क्षमता आहे. आतापर्यंत 204.146 दलघमी जलसाठा उपलब्ध झाला आहे. मागील वर्षी 23 ऑगस्टपर्यंत 61.053 दलघमी जलसाठा होता. जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता 99.750 दलघमी आहे. लघू प्रकल्पांची साठवण क्षमता 81.425 दलघमी आहे. जुन्या मालगुजारी तलावांची साठवण क्षमता 24.318 दलघमी इतकी आहे. जिल्ह्यातील बोदलकसा, चोरखमारा, मानागड, रेंगेपार, संग्रामपूर, कटंगी, कलपाथरी हे मध्यम प्रकल्प 100 टक्के भरले आहेत तर चुलबंद, खैरबंदा या मध्यम प्रकल्पांमध्ये अनुक्रमे 97.17 व 91.93 टक्के साठा झाला आहे. 23 लघु प्रकल्पांपैकी एकमेव ओवारा लघु प्रकल्पात 88.50 टक्के साठा आहे तर 38 जुन्या मालगुजारी तलावांपैकी गोठणगाव तलावात 85.39 टक्के साठा आहे. उर्वरित 37 तलाव ओसंडून वाहत आहेत. आज स्थितीत 9 मध्यम प्रकल्पांत 98.20 टक्के, 23 लघु प्रकल्पांत 100 टक्के साठा आहे तर 38 जुन्या मालगुजारी तलावांत 99.09 टक्के साठा आहे. गतवर्षी याच तारखेत अनुक्रमे 28.20, 30.39 आणि 40.81 टक्के साठा होता.
उल्लेखनीय म्हणजे आज स्थितीत लघु reservoirs पाटबंधारे विभागाच्या 70 प्रकल्पांमध्ये 92.64 टक्के साठा आहे तर गतवर्षी याच तारखेत केवळ 29.71 टक्के साठा होता. देवरी तालुक्यातील छत्तरटोला, सालेगाव व चारभाटा हे लघु पाटबंधारे विभागाचे स्थानिक तलावही शंभर टक्के भरले आहेत. सध्या जिल्ह्यातील बहुतांश जलाशये, प्रकल्प फुल्ल झाल्याने यावर्षी पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचाही प्रश्न मिटणार असल्याचे जिल्ह्यातील तलावांच्या जलसाठा स्थितीवरून दिसून येत आहे.