दोन कंत्राटी कर्मचार्यांना लाच घेताना अटक
चिमूर- कंत्राटी मानधन तत्त्वावर कार्यरत असलेल्या गणित व अभियांत्रिकी चित्रकला निर्देशकाचे मानधन काढून देण्याच्या मोबदल्यात बारा हजार रुपयाची लाच घेताना चिमूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील दोन कर्मचार्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी (१८ ऑगस्ट) रंगेहात अटक करण्यात आली. शांताराम किसनदास राठोड, प्रशांत वसंतराव वांढरे अशी आरोपींची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार, तक्रारकर्ती ही चिमूर येथील रहिवासी असून, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चिमूर येथे तासिका, मानधन तत्त्वावर गणित व अभियांत्रिकी चित्रकला निर्देशक म्हणून कार्यरत आहे. तिचे माहे फेब्रुवारी ते मे २0२२ पयर्ंतचे या चार महिन्यांचे मानधन काढून देण्यात आले तर उर्वरित तीन महिन्यांचे मानधन काढावयाचे आहे. काढलेले आणि उर्वरित मानधन काढण्याकरिता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चिमूर येथील आरोपी गटनिदेशक (कंत्राटी) शांताराम किसनदास राठोडने ११ ऑगस्ट २0२२ रोजी तक्रारकर्तीकडे बारा हजार रुपयांची मागणी केली होती. मात्र, तक्रारकर्तीची लाच स्वरूपात पैसे देण्याची इच्छा नसल्याने तिने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीची पडताळणी करून गुरुवार, १८ ऑगस्ट २0२२ रोजी बारा हजार रुपयांची लाच देण्याकरिता सापळा रचण्यात आला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत तक्रारकर्तीकडून गटनिदेशक (कंत्राटी) शांताराम किसनदास राठोड व निर्देशक प्रशांत वसंतराव वांढरे यांना बारा हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली. ही कारवाई पोलिस उपायुक्त तथा पोलिस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलिस अधीक्षक मधुकर गिते, पोलिस उपअधिक्षक अविनाश भामरे यांच्या मार्गदर्शनात पो.नि. जितेंद्र गुरनुले, नापोकॉ. नरेशकुमार नन्नावरे, नापोका संदेश वाघमारे, पो.अ. अमोल सिडाम, रविकुमार ढेंगळे, म.पो.अ. मेघा मोहुर्ले व सतीश सिडाम यांनी ही कारवाई केली.