जिल्ह्यातील 70 गावांची नावे बदलली, महापुरुषांची दिली नावे
गोंदिया: गाव, वस्त्या व रस्त्यांची जातीवाचक नावे बदलण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. याच धर्तीवर समाज कल्याण विभागाने याची प्रभावीपणे अंमलबजावणी करुन जिल्ह्यातील 12 गावे व 58 वस्त्यांची जातीवाचक नावे बदलली आहे. त्यामुळे पोवारीटोला वस्ती आता शिवाजीनगर म्हणून ओळखली जाणार आहे.
तिरोडा तालुक्यातील 11 व अर्जुनी मोर तालुक्यातील 1 गावाचे तर उर्वरित सहा तालुक्यातील 58 वस्त्यांची नावे जातीवाचक होती. राज्यातील अजुनही अनेक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात गावांना व वस्त्यांना, रस्त्यांना जातीवाचक नावे आहे. पुरोगामी महाराष्ट्रासाठी ही बाब भूषावह नाही. त्यामुळे ही नावे बदलविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. यासंदर्भात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे 11 डिसेंबर 2020 रोजी शासन निर्णय जारी करण्यात आला. यानंतर गोंदिया जिल्ह्यात याची पंचायत समिती व नगरपरिषदेच्या माध्यमातून अंमलबजावणी केली गेली. त्यातंर्गत जिल्ह्यातील 12 गावे व 58 वस्त्यांची नावे बदलण्यात आली आहे. या गावांना व वस्त्यांना बुद्धनगर, दत्तात्रयनगर, जंबुद्वीपनगर, संत रवीदासनगर, आदर्शनगर, जोतिबानगर, एकलव्यनगर अशी नावे देण्यात आली आहे.
राज्यातील सामाजिक सलोखा व सौहार्द निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मता वृद्धींगत करण्याच्या उद्देशाने जातीवाचक गावांची नावे बदलून त्याऐवजी महापुरुषांची नावे देण्यात येणार होती. जोतिबा फुले, रमाई, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, समता, सिद्धार्थ अशी नावे द्यायची होती. याचीच अंमलबजावणी जिल्ह्यात करण्यात आली.