गोंदिया जिल्हात शेतकर्‍यांसाठी पीक स्पर्धा , कृषी विभागाची माहिती , जाणून घ्या निकष

गोंदिया 08: शेतकर्‍यांची आलेली उत्पादकता आधारभूत घेऊन राज्य, विभाग, जिल्हा व तालुकास्तरावरील बक्षीसे देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यातंर्गत शेतकर्‍यांसाठी शासनाच्या वतीने पीक स्पर्धा घेण्यात येणार असून या माध्यमातून शेतकर्‍यांना आपला विकास साधता येणार आहे. दरम्यान जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी भात, मका, तूर व सोयाबीन पिकासाठी अर्ज करुन स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

शासनाकडून आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत सर्वच शेतकर्‍यांना सहभागी होत येणार आहे. स्पर्धेतील पिकांची निवड करताना पिकनिहाय तालुक्यातील क्षेत्र किमान 1 हजार हेक्टर असावे लागणार आहे. विशेष म्हणजे, भात, मका, तूर व सोयाबीन पिकासाठी 31 ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. पिकाच्या उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकर्‍यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकर्‍यांना उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती व मनोबल वाढून आणखी उमेदरीने नवनवीन अद्यायावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकर्‍यांचे योगदान मिळेल. त्याचबरोबरच त्यांचे मार्गदर्शन इतर शेतकर्‍यांना मिळून उत्पादनात मोलाची भर पडेल या उद्देशाने राज्यातंर्गत पीक स्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.

स्पर्धक संख्या, पीक स्पर्धा, कापणी प्रयोग घ्यावयाची संख्या स्पर्धेसाठी तालुका हा एक घटक आभारभूत धरण्यात येईल. किमान स्पर्धक संख्या ही सर्वसाधारण गटासाठी 10 व आदिवासी गटासाठी 5 असेल. स्पर्धेत सहभागी लाभार्थ्यांच्या शेतावर त्या पिकाखाली किमान 10 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. पीक कापणी प्रयोग घ्यावयाची किमान संख्या सर्वसाधारण गटासाठी 5 व आदिवासी गटासाठी 4 असेल. स्पर्धेतील पिकाच्या कापणीसाठी प्लॉटची निवड सांख्यिकी विभागाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार करण्यात येईल. पीक कापणी करताना असंबंधित मंडळातील अधिकार्‍यांना पर्यवेक्षणाचे काम देण्यात येणार आहे. या योजनेमुळे शेतकर्‍यांना पीक उत्पादकता वाढविण्यात लाभ होणार असून बक्षीसाच्या रुपाने आर्थिक बळ मिळणार आहे. 

असे आहेत निकष:

ज्या शेतकर्‍याच्या नावावर जमीन असेल तो जमीन स्वतः कसत असला पाहिले. एकाच वेळी अनेक स्पर्धेत सहभागी होता येईल. दोन्ही गटासाठी स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क प्रत्येकी 300 रुपये राहील. तालुकास्तरावर स्पर्धा आयोजनासाठी सर्वसाधारण गटासाठी किमान 10 व आदिवासी गटासाठी किमान 5 यापेक्षा प्रवेश अर्ज कमी असल्यास पीक स्पर्धा रद्द करण्यात येऊन प्रवेश शुल्क परत देण्यात येईल. 

बक्षिसांचे स्वरुप:

•तालुकास्तरीय स्पर्धेसाठी प्रथम 5 हजार, द्वितीय 3 हजार व तृतीय 2 हजार रुपये बक्षीस.

• जिल्हास्तरावर प्रथम 10 हजार, द्वितीय 7 हजार व तृतीय 5 हजार रुपये.

• विभागस्तरावर प्रथम 25 हजार, द्वितीय 20 हजार व तृतीय 15 हजार रुपये. 

• राज्यस्तरावर प्रथम 50 हजार, द्वितीय 40 हजार व तृतीय 30 हजार रुपये बक्षीस.

Share