देवरी तालुक्यात हिवतापाचा प्रकोप वाढला, वैद्यकीय सल्ला आणि काळजी घ्या
देवरी 27: तालुक्यात जलजन्य परिस्थितीमुळे हिवताप रुग्णांमध्ये वाढ होत आहे. आतापर्यंत जिल्हात 193 हिवताप रुग्ण आढळले असून आरोग्य विभागातर्फे नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तालुक्यात जुलै महिन्यापासून पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे डासांचा चांगलाच प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी हिवताप, डेंग्यूसह इतर किटकजन्य व जलजन्य आजारांनी डोके वर काढले आहे. या आजारांवर नियंत्रण ठेवणारी आरोग्य यंत्रणा कमी पडू लागली आहे. शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयांत रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. जिल्हा आरोग्य विभागतर्फे हिवताप व डेंग्यू आजारावर आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. यातंर्गत हिवताप आजाराशी संबंधित प्लास्मोडियम विवेक्स व प्लास्मोडियम फाल्सीवेरम संक्रमण चाचण्या घेण्यात येत आहेत. आतापर्यंत घेण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये एकूण 193 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणांसह घर-शिवारात साचलेल्या पाण्याचा निचरा जिल्हा प्रशासनातर्फे होणे अपेक्षित आहे.
मलेरिया ची लक्षणे आढळताच वैद्यकीय उपचार घ्या : डॉ. लक्ष्मीकांत चांदेवार यांचा सल्ला
ताप, उल्टी, हगवण, डोकेदुखी, श्वास लागने, चक्कर येणे आदी लक्षणे आढळताच जवळच्या रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावे.घरातील साचलेल्या पाण्यात मलेरिया डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे आठवड्यातून एक दिवस घरात साचविलेले पाणी फेकणे गरजेचे आहे. स्वच्छतेवर लक्ष देऊन मच्छरदानीचा उपयोग करावा.