38 तलाव परिसरात पर्जन्यमान मापक यंत्रच नाहीत! पावसाची अचूक नोंद कशी ?

गोंदिया: पावसाची अचूक नोंद व्हावी म्हणून शासनातर्फे महसूल मंडळे, प्रकल्पे, तलाव परिसरात पर्जन्यमान मापक यंत्र लावणे अपेक्षित आहे. मात्र जिल्ह्यातील 38 जुन्या मामा तलाव परिसरात पर्जन्यमान मापक यंत्रच लावण्यात आली नसल्याने परिसरात किती पाऊस झाला याची अचूक माहिती व नोंद घेण्यास संबबंधित विभागाच्या कर्मचार्‍यांना अडचणी येत आहेत.

जिल्ह्यात महसूल व पाटबंधारे विभागाद्वारे पावसाळ्यात पर्जन्यमान मापक यंत्राच्या माध्यमातून पावसाची नोंद घेतली जाते. मात्र जिल्ह्यातील 38 जुने माजी मालगुजारी तलाव परिसरात ही यंत्रेच लावण्यात आले नसल्याची बाब समोर आली आहे. जिल्ह्यातील मध्यम, लघू व जुने माजी मालगुजारी तलावांच्या जलसाठ्याची अद्यावत माहिती पाटबंधारे विभागाद्वारे घेतली जाते. जिल्ह्यात पाटबंधारे विभागाच्या कार्यक्षेत्रात 9 मध्यम, 22 लघु आणि 38 मामा तलाव असे एकूण 69 प्रकल्पांचा समावेश आहे. पैकी मध्यम व लघु प्रकल्पांच्या क्षेत्रात पर्जन्यमान मापक यंत्र लावण्यात आले असल्याची माहिती आहे.

यामुळे येथील जलसाठा व पावसाची अचूक नोंद घेण्यात या विभागाला सोयीचे होते. मात्र याच पाटबंधारे विभागाच्या 38 पैकी एकाही जुन्या मालगुजारी तलाव परिसरात पर्जन्यमान मापक यंत्र लावण्यात आले नसल्याने येथे केव्हा व किती पाऊस झाला याची माहिती उपलब्ध होऊ शकत नाही. हे तलाव शेतकर्‍यांसाठी सिंचनाचे महत्त्वाचे माध्यम आहे. मात्र ते आज उपेक्षीत पडले आहेत. यापैकी काही तलावाची साठवण क्षमताही कमी झालेली आहे. कित्येक वर्षापासून या तलावांची दुरुस्ती व गाळ उपसा करण्यात आले नाही. काही तलावात अतिक्रमण झाले आहे. शासनाने या तलाव परिसरात पर्जन्यमान मापक यंत्र बसवून त्यांचे पुनरुज्जीवन करण्याची गरज व्यक्त होत आहे.

पावसाची अचूक नोंद घेण्यासाठी पर्जन्यमान मापक यंत्र असणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील जुन्या माजी मालगुजारी तलाव परिसरात पर्जन्यमान मापक यंत्र नाहीत. याबाबत वरिष्ठांना अवगत करण्यात आले आहे. मंजुरी मिळाल्यानंतर सदर यंत्र लावण्यात येणार असल्याचे पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनाली सोनुले यांनी सांगितले.

Print Friendly, PDF & Email
Share