आरोग्य, शिक्षण व रोजगार निर्मितीवर भर द्या : जिल्हाधिकारी

गोंदिया: मानव विकास निर्देशांक वाढीसाठी आधारभूत घटक असलेल्या आरोग्य, शिक्षण व रोजगार निर्मितीवर भर देण्यात यावा अशा सूचना जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी केल्या.

जिल्हाधिकारी नयना गुंडे अध्यक्षतेखाली आज, 26 जुलै रोजी Human Development Schemes मानव विकास कार्यक्रम अंतर्गत राबविण्यात येणार्‍या योजनांबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा नियोजन अधिकारी (मानव विकास) श्रीराम पाचखेडे व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकार्‍यांनी मानव विकास निर्देशांक संदर्भात आधारभूत असलेले आरोग्य, शिक्षण व रोजगार निर्मिती असे तीन घटक असून मानव विकास निर्देशांक वाढविण्यासाठी गरीबीतील गरीब घटक शोधून त्यांच्यापर्यंत योजनेचा लाभ पोहचविणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले.

विविध विभागांच्या मानव विकास कार्यक्रम अंतर्गत राबविण्यात येणार्‍या योजनांसोबत एकत्रित करुन जास्तीत जास्त अनुसूचित जाती, जमाती, आदिवासी घटक अंतर्गत कार्यरत बचत गटांना 90 टक्के शासन हिस्सा व 10 टक्के लाभार्थी हिस्सा या तत्त्वावर योजनांचे प्रस्ताव तयार करून सादर करण्याच्या सूचना त्यांनी सर्व उपस्थित विभाग प्रमुखांना दिल्या. दारिद्रय निर्मूलन व उपासमारीचे समूळ उच्चाटन यावरच जास्तीत जास्त भर देण्यात यावा असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकार्‍यांनी सभेत दिले. विविध विभागांच्या प्रमुखांसोबत सन 2021-22 अंतर्गत राबविण्यात आलेल्या योजनांचा आढावा तसेच विविध विभागांनी सादर केलेल्या प्रस्तावांवर सविस्तर चर्चा करण्यात आली व परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. उपस्थितांचे आभार सहायक जिल्हा नियोजन अधिकारी पूजा पाटील यांनी मानले.

Share