गोंदिया जिल्हातील 13 प्रकल्प 100 टक्के भरली
गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 4 पट पाणी साठा
गोंदिया: जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पात पाणीसाठा वाढतो आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील एक मध्यम, 3 लघु आणि 9 जुने मालगुजारी तलाव शंभर टक्के भरून ओसंडून वाहत आहेत. तसेच अनेक गावतळे आणि पाझर तलाव भरले आहेत. काही मोठ्या व मध्यम प्रकल्पातील पाणी पातळी मृतसाठ्यातून वर आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याची समस्या दूर झाली आहे. विशेष म्हणजे गतवर्षी आज तारखेत केवळ 15.98 टक्के साठा होता तर यावर्षी 58.33 टक्के साठा झाला आहे
उन्हाळ्यात जिल्ह्यातील अनेक सिंचन प्रकल्प कोरडे पडले होते. यावर्षीही सिंचन प्रकल्पात पाणी साठेल असा पाऊस जुलैचा आठवडा संपूनही झाला नव्हता. त्यामुळे सिंचन प्रकल्पाची अवस्था पावसाअभावी गतवर्षीसारखी होते की काय अशी शंका डोकावत होती. मात्र गेल्या आठवड्यात जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. जिल्ह्यातील लहानमोठ्या सिंचन प्रकल्पात पाणीसाठा जमा होऊ लागला. जिल्ह्यातील 9 मध्यम प्रकल्पात 61.09 साठा झाला आहे. कटंगी मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरला आहे. रेंगेपार मध्यम प्रकल्पात 91 टक्के साठा झाला आहे. 22 लघु प्रकल्पात 48.34 टक्के साठा आहे. सोनेगाव, मोगरा, गुमडोह हे लघु प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. 38 जुने मालगुजारी तलावांत 80.48 टक्के साठा आज तारखेत आहे. चान्ना बाक्टी, फुलचूर, गंगेझरी, मालीजुंगा, मुंडीपार, मेंढा, मोरगाव, माहूरकुडा, सौंदड हे मामा तलाव शंभर टक्के भरले आहेत. जिल्ह्यातील लघु पाटबंधारे विभाग राज्यस्तराच्या 9 मध्यम, 22 लघु आणि 38 जुने मालगुजारी तलाव अशा 69 प्रकल्पात आज स्थितीत 58.33 टक्के साठा आहे. गतवर्षी याच तारखेत 15.98 टक्के साठा होता.
मोठे प्रकल्पातील जलसाठा
जिल्ह्यात मोठ्या प्रकल्पापैकी सध्या पुजारीटोला प्रकल्पाचे दोन वक्रद्वारातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पुजारीटोला प्रकल्पात 72.91 टक्के, इटियाडोह 45.47 टक्के, शिरपूर प्रकल्प 30.01 टक्के व कालीसराड प्रकल्पात 62.01 टक्के जलसाठा आहे.
अर्जुनी मोर तालुक्यात अतिवृष्टी
जिल्ह्यात मागील चोवीस तासात 17 मिमी पाऊस तर अर्जुनी मोर तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. अर्जुनी मोर तालुक्यात 70.5 मिमी, गोेंदिया 5.5, आमगाव 3.5, तिरोडा 3.6, गोरेगाव 1.8, सालेकसा 2.5, देवरी 6.6 व सडक अर्जुनी तालुक्यात 29.6 मिमी पाऊस झाला.