मागेल त्याला माफक दरात राष्ट्रध्वज उपलब्ध करू
गोंदिया: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 11 ते 17 ऑगस्ट दरम्यान ‘हर घर तिरंगा’ कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज फडकविला जावा यासाठी जिल्हा प्रशासनाने नियोजन केले आहे. प्रत्येक घर, शासकीय निमशासकीय कार्यालय, शाळा महाविद्यालय, ग्रामपंचायत, नगरपालिका व नगरपंचायत कार्यालयावर राष्ट्रध्वज डौलाने फडकविला जाणार आहे. यासाठी महिला बचत गट व उमेदकडे झेंडे पुरविण्याची मागणी नोंदविली आहे. मागेल त्याला राष्ट्रध्वज अगदी माफक दरात उपलब्ध करून देण्याचे नियोजनही प्रशासनाने केले असल्याची माहिती आज सोमवार 18 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पत्रपरिषदेत जिलहाधिकारी नयना गुंडे दिली.
यावेळी गुंडे यांनी राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक फडकविला जाईल याची दक्षता घ्यावी, नागरिकांनी या उपक्रमात स्वयंस्फुर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी नयना गुंडे व मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी जयराम देशपांडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबरीश मोहबे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे, महावितरणचे प्रभारी अधीक्षक अभियंता शरद वानखेडे उपस्थित होते.
हर घर झेंडा, कोविड लसीकरण अमृत महोत्सव, उज्वल भारत-उज्वल भविष्य या उपक्रमांची माहिती गुंडे यांनी यावेळी दिली. ग्रामीण भागासाठी 2 लाख 91 हजार तर शहरी भागासाठी 25 हजार झेंडे लागणार आहेत. घरावर झेंडा लावणे ऐच्छिक असले तरी देशाभिमानासाठी नागरिकांनी आपल्या घरावर राष्ट्रध्वज तिरंगा लावावा असे आवाहनही त्यांनी केले. याशिवाय सामाजिक संस्था, व्यापारी प्रतिष्ठान, शिक्षण संस्था सेवाभावी नागरिक यांना झेंडे विकत घेऊन नागरिकांना वितरित करण्याची इच्छा असल्यास प्रशासन सहकार्य करेल असेही त्या म्हणाल्या. या उपक्रमासाठी जिल्ह्यातील शासकीय अधिकारी, कर्मचार्यांनी आपले एक दिवसाचे वेतन द्यावे यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगीतले. महिला बचत गट, प्रत्येक स्वस्त धान्य दुकान, नगरपालिका व जिल्हा परिषद येथील पलाश केंद्रात झेंडे माफक दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.राष्ट्रीय ध्वज सन्मानपूर्वक फडकविला जाईल याची दक्षता घ्या
तिरंगा फडकवीत असतांना राष्ट्रीय ध्वज सन्मानपूर्वक फडकविला जाईल याची दक्षता घ्यावी, राष्ट्रीय ध्वज हे हाताने कातलेल्या आणि हाताने विणलेल्या किंवा मशीनव्दारे तयार केलेल्या सुत, पॉलिस्टर, लोकर, सिल्क खादी कापडापासून बनविलेला असावा, राष्ट्रीय ध्वजाचा आकार आयाताकृती असेल, झेंड्यांची लांबी व रूंदी 3:2 फूट प्रमाणात राहिल, जेथे ध्वज उघड्यावर प्रदर्शित केला जातो त्याठीकाणी हवामान कसेही असले तरी ध्वज सुर्योदयापासून सुर्यास्तापर्यंत फडकविला जाईल, राष्ट्रीय ध्वज फडकविताना केशरी रंग वर आकाशाकडे असावा व हिरवा रंग जमीनीच्या दिशेने खाली असावा, राष्ट्रीय ध्वज फडकविताना स्तंभाच्या वरच्या टोकावर लावावा.
मध्यभागी वा खाली लावू नये, ध्वज चढवताना लवकर चढवावा व उतरवताना सावकाश उतरावा, ध्वजावर कोणत्याही प्रकारचे अक्षर लिहलेले नसावे, ध्वज जाणुनबुजून जमीनीवर अथवा पाण्यामध्ये बुडणार नाही अश्या पध्दतीने लावावा, राष्ट्रीय ध्वजाचा उपयोग इमारत झाकण्यासाठी करता येणार नाही, राष्ट्रीय ध्वजाचा वापर व्यवसायासाठी करता येणार नाही, खराब झालेला, फाटलेला, मळलेला ध्वज फडकविला जाणार नाही, ध्वजाचा वापर सजावटीसाठी केला जावू नये, तिरंगाच्या ध्वजस्तंभावर अन्य कोणताही ध्वज लावता येणार नाही तसेच त्याच्या उंचीवर अन्य कोणताही ध्वज फडकविता येणार नाही. ध्वजाचा अवमान झाल्यास करणार्यास तिन वर्षापर्यंतची कैद वा आर्थीक दंड अथवा दोन्ही अशी शिक्षा देण्याची कायद्यात तरतूद आहे, याची जाणीव घ्यावी असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.