शिक्षण विभागाच्या परवानगी विना जिप शाळेत कॉन्व्हेंट सुरू, मुख्याध्यापक व गटशिक्षणाधिकारी यांच्यावर कारवाई ची मागणी

गोंदिया: शिक्षण विभागाच्या परवानगी विनाच गोंदिया पंचायत समिती अंतर्गत येणार्‍या लोधीटोला, रतनारा, खमारी आदी गावांतील जिल्हा परिषद शाळांमध्ये कॉन्व्हेंट सुरू करण्यात आल्याची बाब समोर आली असून या गावांतील अंगणवाडीतील बालकांची संख्या रोडावली आहे. विनापरवानगी कॉन्व्हेंट सुरू करणार्‍या मुख्याध्यापक व गटशिक्षणाधिकारी यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती सविता पुराम यांच्या नेतृत्वात अंगणवाडी सेविकांच्या सीटू संघटनेने 18 जुलै रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज राहांडाले यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

बाल वयातच बालकांवर योग्य संस्कार व त्यांना प्राथमिक शिक्षण मिळावे या उद्देशाने शासनाच्या एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयातमार्फत प्रत्येक गावांत अंगणवाडीच्या माध्यमातून बालकांना शिक्षण व पोषण आहार दिला जातो. मात्र आजच्या कॉन्व्हेंट संस्कृतीच्या फॅडमुळे अनेक पालक त्यांची मुले इंग्रजी माध्यमांच्या कॉन्व्हेंटमध्ये पाठवीत आहेत. ग्रामीण भागातील जिपच्या शाळांची विद्यार्थी संख्या कमी होत आहे. अशातच गोंदिया पंचायत समितीने ठराव घेऊन ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या वर्ग 1 ते 8 वीपर्यंतच्या शाळांमध्ये कॉन्व्हेंट सुरू करण्याचा ठराव घेतला. या अनुषंगाने मुख्याध्यापक, केंद्रप्रमुखांची सभा घेण्यात आली.

सदर ठराव परवानगीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आला. परंतु वरिष्ठ कार्यालयाने परवानगी न देताच तालुक्यातील लोधीटोला, रतनारा, खमारी येथील जिप शाळेत कॉन्व्हेंट सुरू करण्यात आले आहे. परिणामी या गावातील अंगणवाडीतील बालकांची संख्या रोडावली आहे. परवानगी न घेताच सुरू केलेले कॉन्व्हेंट बंद करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी सीटू या अंगणवाडी सेविकेच्या संघटनेतर्फे जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले यांना महिला व बालकल्याण सभापती सविता पुराम यांच्या नेतृत्वात देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. निवेदन देतेवेळी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष प्रेमलता तेलसे, सचिव कल्पना पटले, सहसचिव लीलावती रहांगडाले, कोषाध्यक्ष कुसुम लिचडे, उपाध्यक्ष कविता सहारे, शकुंतला गोंडाणे संगीता बांते, कविता मोहरे, शकुंतला हेमणे, आशा मसकरे, सुनीता रहमतकर आदी उपस्थित होत्या.

हा तर अंगणवाड्या बंद करण्याचा घाट – सविता पुराम

ग्रामीण भागात कॉन्व्हेंट संस्कृतीचे लोन पोहोचले असले तरी आजही अंगणवाड्यांमधून बालकांना संस्कारक्षम शिक्षण दिले जात आहे. अंगणवाड्यांमध्ये इंग्रजी माध्यमातून शिक्षण सुरू करण्याची गरज आहे. अंगणवाड्या व जिल्हा परिषद शाळा एकाच यंत्रणेच्या आहेत. एकाला बंद करून दुसर्‍याला सुरू ठेवणे हा अंगणवाडी बंद करण्याचा घाट असल्याची प्रतिक्रिया महिला व बालकल्याण सभापती सविता पुराम यांनी दिली.

अहवाल मागवुन कारवाई करू – कादर शेख शिक्षणाधिकारी

यासंदर्भात जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी कादर शेख यांना विचारले असता, जिल्हा परिषद शाळांना कॉन्व्हेंट सुरू करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही, ज्या शाळांमध्ये कॉन्व्हेंट सुरू केले असेल त्यासंबंधीचा अहवाल मागून कारवाई करण्यात येणार असल्याचे शेख यांनी माध्यमांना सांगितले.

Share