बांधकाम कंपनीला ग्राहक मंचचा दणका

गोंदिया: संपूर्ण पैसे घेऊन गळका फ्लॅट देणार्‍या व दुरुस्तीसाठी टाळाटाळ करणार्‍या बांधकाम कंपनीला जिल्हा ग्राहक मंचाने 10 हजार रुपये नुकसान भरपाई व न्यायालयीन खर्चाचे 10 हजार रुपये फ्लॅटकर्त्याला देण्याचा आदेश दिला आहे. दि. मीरा इंफ्रास्ट्रॅक्चर असे बांधकाम कंपनीचे नाव आहे.

गोंयिा येथील प्रमोद मेश्राम यांनी दोन वर्षापूर्वी दि. मीरा इंफ्रास्ट्रक्चर कंपनीकडून फ्लॅट विकत घेतला होता. मात्र तो पहिल्याच पावसाळ्यात गळायला लागला. याबाबत मेश्राम यांनी कंपनीकडे फ्लॅट दुरुस्तीची वेळोवेळी मागणी केली. मात्र कंपनीने त्याकडे दुर्लक्ष करुन टाळाटाळ केली. दरम्यान मेश्राम यांनी यासंदर्भात 4 जानेवारी 2021 रोजी जिल्हा ग्राहक मंचाला तक्रार केली होती.

याप्रकरणाचा निकाल देताना जिल्हा ग्राहक मंचाने दि. मीरा इंफ्रास्ट्रॅक्चर कंपनीला मेश्राम यांना नुकसान भरपाईचे 10 हजार रुपये व न्यायालयीन खर्चाचे 10 हजार रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच आदेशाचे पालन न केल्यास 6 टक्के व्याजाने रक्कम अदा करावी लागेल असे देखील आदेशात नमूद आहे. या प्रकरणात तक्रारदाराच्या बाजूने अ‍ॅड. एन. डी. भौतिक यांनी तर गैरअर्जदाराच्या बाजूने अ‍ॅड. मोबीन शेख यांनी काम पाहिले.

Print Friendly, PDF & Email
Share