जिल्ह्यात पावसाची हजेरी कायम,वाहून गेलेल्या चौघांपैकी तिघांचे मृतदेह मिळाले

गोंदिया 14: गोंदिया जिल्ह्यात मंगळवारच्या रात्रीपासून सुरु असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन आजही विस्कळीत झाले आहे.सततच्या पावसामुळे सालकेसा तालुक्यातील हाँजराफाॅल धबधबा ओसंडून वाहू लागला आहे. त्यातच लोधीटोला व गौतमनगर येथील नाल्यातून वाहून गेलेल्या चौघापैंकी तिघांचे मृतदेह आपत्ती निवारण विभागाच्या शोधपथकाने आज 14 जुर्लैला शोधून काढले,त्यामध्ये गौतमनगर येथील चौथा नाल्यात जावेद अली हजरत अली सय्यद व बाबा उर्फ रेहान कलीम शेख तसेच खमारी येथील पुजारीटोला नाल्यात आशिष बागडेचा समावेश आहे. तर एक व्यक्ती अद्यापही बेपत्ता आहे.

त्यातच गोंदिया तिरोडा राज्यमार्गावरील एकोडी-बरबसपूरादरम्यान राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरण्यात तयार करण्यात येत असलेल्या पुलाच्या बांधकामामुळे नाल्यावरुन कच्चा रस्ता वाहून गेल्याने वाहतुक विस्कळीत झाली होती.त्या मार्गावर आज सकाळपासून वाहतुक सुरळीत झालेली आहे.मात्र पांगोली नदीवर गिरोला ते सिंधीपारटोला या गावादरम्यान तयार करण्यात आलेला पुल वाहून गेल्याने या दोन्ही गावांचा आमगाव तालुकास्थळाशी होणारा संपर्क अद्याप तुटलेला आहे. जिल्ह्यात 14 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.आज सकाळपासून पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.आज सकाळी 8 वाजेपर्यंत जिल्ह्यातील गोंदिया तालुक्यात 16.3 mm,आमगाव-13.4 mm,तिरोडा- 34.6 mm,गोरेगाव- 12.7 mm,सालेकसा 12.1 mm,देवरी 2.3 mm,अर्जुनी/मोरगाव- 18.5 mm,सडक/अर्जुनी- 4.0 mm पावसाची नोंद करण्यात आली आहे.

Share