देवरीच्या दारू व्यावसायिकाला लुटणाऱ्या तीन जणांना अटक

◼️स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई सात आरोपींचा समावेश, आरोपी छत्तीसगड व बिहार राज्यातील

■ देवरीच्या त्रिमूर्तीनगरातील दारू विक्रेता देवराज नरसय्या गुन्नेवार (५१) यांना २८ जून रोजी सायंकाळी ७ वाजता दमदाटी करुन गाडीत मागे ठेवलेली पैशाची बॅग घेऊन गेले. त्या बॅगमध्ये ५ लाख १० हजार रुपये होते. ७ आरोपींनी या पैशाची आपसात वाटणी भिलाई येथे केल्याची कबुली दिली आहे.

देवरी 14: शहरातील त्रिमूर्तीनगरात वास्तव्याला असलेले व्यावसायिक देवराज नरसय्या गुन्नेवार (५१) यांना २८ जून रोजी सायंकाळी ७ वाजता वडेकसा ते गणूटोला रस्त्यावरील तलावाजवळ अडवून ५ लाख १० हजार रुपये लुटून नेणाऱ्या तीन जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. या प्रकरणात सात आरोपींचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

देवराज नरसय्या गुन्नेवार, रा. त्रिमूर्तीनगर, देवरी हे चारचाकी वाहन क्र. एम.एच.३५ पी-४६८५ ने ककोडी येथील देशी दारू दुकानातील पैशाचा हिशेब करून देवरी येथे जात असताना वडेकसा ते गणूटोलाकडे जाणाऱ्या तलावाजवळ तीन ते चार इसमांनी आपली चारचाकी आडवी करून धमकावीत त्यांच्या गाडीतील पैशाची बॅग हिसकावून नेली. त्या बॅगमध्ये ५ लाख १० हजार रुपये रोख होते. या घटनेसंदर्भात चिचगड पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ३९२, ३४, सहकलम ४, २५ भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद केला होता.

पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, तसेच अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत तपास करण्याचे आदेश दिले. तपास करताना गुप्त माहिती मिळाली ककोडी येथील एका संशयित इसमाला १२ जुलै कसून विचारपूस केली असता गुन्हेगार हे ककोडी , सुपेला (भिलाई) छत्तीसगड, बिहार राज्यातील असून हा गुन्हा त्याने साथीदारांनी करल्याचे कबूल केले .

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक जीवन पाटील, सहायक फौजदार गोपाल कापगते, पोलीस हवालदार तुलशीदास लुटे, पोलीस नायक महेश मेहर, इंद्रजित बिसेन, सोमेंद्र तुरकर, संतोष केदार , विजय मानकर , लक्ष्मण बंजार, प्रमोद निखाडे, पोलीस नायक दीक्षित दमाहे, चिचगड येथील सहायक पोलीस निरीक्षक शरद पाटील, पोलीस हवालदार रामलाल पदमे, पोलीस नायक शहारे, पोलीस शिपाई तांदळे यांनी केली आहे.

Share