आ.अग्रवालांनी ‘वाय प्लस’सुरक्षा नाकारली
गोंदिया: राज्यात मागील काही दिवसात घडलेल्या राजकीय घडामोडीदरम्यान गोंदिया विधानसभेचे अपक्ष आ. विनोद अग्रवाल यांच्या सुरक्षेत वाढ करुन ‘वाय प्लस’ सुरक्षा देण्यात आली होती. दरम्यान, आ. अग्रवाल यांनी वाय प्लस यंत्रणा नाकारुन सुरक्षा यंत्रणा कमी करण्याचे पत्र प्रशासनाला दिले.
राज्यातील महाविकास आघाडीतील शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर त्याचे पडसाद जिल्ह्यातही उमटले होते. यादरम्यान आ. विनोद अग्रवाल यांच्या गोंदिया येथील संपर्क कार्यालय व घरावर काही शिवसैनिकांनी हल्ला केला होता. यापृष्ठभूमीवर त्यांच्या सुरक्षेसाठी 30 पोलिसांची सुरक्षा व्यवस्था व वाय प्लस सुरक्षा व्यवस्था दिली होती. ही सुरक्षा व्यवस्था आ. अग्रवाल यांनी नाकारली आहे.
यासंदर्भात आ. अग्रवाल यांनी सांगितले, आपण लोकांमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न, समस्या सोडविण्याचे काम करतो. सुरक्षे यंत्रणेमुळे यात अडथळा येऊ नये, यासाठी पोलिस अधीक्षकांना पत्र दिल्यानंतर आता केवळ पाच पोलिसांचा बंदोबस्त आहे. तर वाय प्लस सुरक्षा व्यवस्था कमी करण्याची मागणी आपण शासनाकडे केल्याचे त्यांनी सांगितले.