मोबाईलवर बोलत रस्ता पार करणे जीवावर बेतले
भंडारा: बाजारात रस्त्याने मोबाईलवर बोलत जाणे महिलेच्या जीवावर बेतले आहे. सदर महिलेला ट्रकने धडक दिल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना तुमसर येथील शिवाजी नगरातील टेलिफोन एक्सचेंज कार्यालयाजवळ शुक्रवारी दुपारी 2 वाजताच्या सुमारास घडली. मीना थावरदास गिडवाणी (55) रा. वर्धा असे मृत महिलेचे नाव आहे. त्या आजारी आई-वडिलांच्या भेटीसाठी तुमसर येथे आल्याचे समजते.
मीना गिडवाणी यांचे माहेर तुमसर असून आई-वडिलांची प्रकृती बरी नसल्याने त्यांना भेटण्यासाठी त्या येथे आल्या होत्या. शुक्रवारी दुपारी 2 वाजताच्या सुमारास बाजारात फळे घेण्याकरिता पायदळ निघाल्या होत्या. टेलिफोन एक्सचेंज कार्यालयाजवळ त्यांना ट्रक क्रमांक एमएच 35/के 5725 ने त्यांना धडक दिली. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. परिसरातील नागरिकांनी धाव घेत त्यांना तत्काळ उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात नेले. मात्र येथे डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. अपघाताच्या वेळी त्या मोबाईलवर बोलत बोलत रस्ता पार करीत असल्याचे परिसरातील नागरिकांकडून सांगितले जात होते. अपघातानंतर ट्रक चालकाने घटनास्थळापासून पळ काढला. मात्र पोलिसांनी वेगाने तपास करून ट्रक चालक दिनेश्वर पाटील (31) रा. छोटा रजेगाव जि. गोंदिया याला ताब्यात घेतले. याप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक रमेश कुंभरे तपास करीत आहेत.