५५ हजारांच्या कर्जापायी शेतकर्‍याची आत्महत्या

लाखांदूर- राज्यातील मायबाप सरकार सत्ताकारणाच्या डावपेचात गुंतली असताना शेतकर्‍यांच्या अवस्थेकडे दुर्लक्ष होत आहे. या दुर्लक्षामुळे लाखांदूर तालुक्यातील टेंभरी येथील शेतकर्‍यावर अवघ्या ५५ हजारांच्या कर्जापायी आत्महत्येची वेळ आली आहे. देवराम तुळशीराम शिंगाडे (५८) रा. टेंभरी असे मृत शेतकर्‍याचे नाव आहे.
देवराम शिंगाडे हे अनेक वर्षापासून शेतीसह पशुव्यवसाय सुद्धा करायचे. यावर्षी तीन एकर शेतात उन्हाळी धानाची रोवणी करून त्यावर जवळपास साठ हजार रुपयांचेवर खर्च केले. दिवसरात्र मेहनत करूनही तीन एकरात केवळ पंधरा पोती धान उत्पादन झाले असल्याने देवराम नैराश्येत गेले होते. चार, पाच दिवसांपासून देवराम गावात तसेच आजूबाजूच्या गावातील ओळखीच्या लोकांकडे जावून भेटले. त्यावेळी त्यांची मानसिकता विचलित झालेली अनेकांना दिसली होती.
सेवा सहकारी संस्थेच्या जवळपास ५५ हजार रूपयांचे कर्ज तसेच धानाचे उत्पादन कमी झाल्याने कर्जदारांचे पैसे कसे द्यायचे, सोबतच पावसाळी धानाचा हंगाम कसा करायचा, या विवंचनेत सापडलेल्या देवराम शिंगाडे यांनी शेवटी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. रविवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास गावाशेजारी असलेल्या शेतावरील विहिरीत नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविली. देवराम शिंगाडे यांनी आत्महत्या केल्याची माहिती गावात वार्‍यासारखी पसरली. यावेळी परिसरातील नागरिकांनी एकाच गर्दी केली होती.
लाखांदूर पोलिसांना माहिती मिळताच पोलिस निरीक्षक रमाकांत कोकाटे यांचे मार्गदर्शन पोलिस पथकाने घटनास्थळी जावून घटनेचा पंचनामा केला. देवराम शिंगाडे यांच्यामागे पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. धानाचे कमी उत्पन्न झाल्याने कर्जाच्या बोझ्याखाली दबलेल्या शेतकर्‍याच्या आत्महत्येमुळे गावात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

Share