महावितरणच्या सहायक अभियंत्यास लाच घेताना अटक
वरोरा- तालुक्यातील महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनीचे असिस्टंट इंजिनिअर श्रीणू चुक्का यांना फिर्यादीकडून सहा हजार रुपयांची लाच घेताना चंद्रपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस निरीक्षक शिल्पा भरडे व त्यांच्या सहकार्यांनी अटक केली आहे.
फियार्दी सौरऊर्जा संबंधित मीटरच्या कामासाठी अनेक दिवसांपासून महावितरणकडे जात होता. परंतु दरवेळी कोणत्या ना कोणत्या कारणावरून श्रीणू चुक्का माघारी पाठवत असायचे. शेवटी फिर्यादीने वैतागून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार केली. त्याप्रमाणे सापळा रचण्यात आला. शेवटी चुक्का यांना ६000 रुपयांची लाच देण्याचे ठरले. चुक्का यांनी सहा हजार घेताच लाचलुचपत अधिकार्यांनी त्याला रंगेहात अटक केली. यात चुक्कासह अनेक अधिकारी यात गुंतून असल्याची शंका आहे. यापूर्वीसुद्धा या विभागाबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. परंतु ठोस पुराव्याअभावी कोणतीही कारवाई होऊ श्कली नाही. महावितरणमध्ये कोणतेही काम करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात पैशांची मागणी केल्या जाते. सौर मीटर लावण्यासाठी पाच हजार रुपये याप्रमाणे ठेकेदाराला पैशांची मागणी केली जाते. त्यामुळे वरोरा शहरातील सौर मीटरचे बरेच काम रखडले आहे. यामध्ये कमिशन एजंट नेमून काम करण्याचा पायंडा वरोरा महावितरण कंपनीने घातलेला आहे. यामध्ये बाबूपासून अधिकार्यापयर्ंत चिरीमिरी घेऊन काम करीत असल्याची चर्चा आहे. अनेक दिवसांपासून वरिष्ठांचे नियंत्रण नसल्यामुळे वरोरा महावितरण कंपनीमध्ये ग्राहकांना याचा त्रास सहन करावा लागत होता.
शहरातील नवीन कनेक्शन घेण्यासाठी मोठय़ा प्रमाणात पैशांची मागणी केली जाते. मात्र, उघडपणे आपले काम होणार नाही, या भीतीने हा गैरव्यवहार अशाच पद्धतीने सुरू होता. वरोरा महावितरण कंपनीमधील अधिकारी गेल्या पाच वर्षांपासून मलाई खात आहेत. मात्र, अजूनपर्यंत त्यांच्या बदल्या होत नाही. त्यामुळे वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. लाचखोर अभियंता चुका यांना अटक झाल्यामुळे अनेक ग्राहकांनी समाधान व्यक्त केला आहे.