205 गावांमध्ये पसरला अंधार, ग्रामपंचायतीच्या दिव्यांची बत्तीगुल
◼️देवरी तालुक्यातील 33 गावांचे पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडीत
गोंदिया/देवरी 20: गावे प्रकाशाने उजळून निघावीत म्हणून ग्रामपंचायत प्रशासन पथदिवे लावून रात्री वीजपुरवत असते. मात्र अनेक ग्रामपंचायतीकडे वीजबिल इतके वाढले की, महावितरणला गावातील पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडीत करावा लागत आहे. यानुसार आतापर्यंत जिल्ह्यातील 205 गावांमध्ये लावलेल्या पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या ग्रामपंचायतींकडे पथदिव्यांचे 3 कोटी 18 लाख रुपयांहून अधिक बीजबिल असल्याची माहिती आहे. वीजपुरवठा खंडीत झाल्याने या गावातील रस्त्यांवर अंधार पसरल्याचे चित्र आहे.
गावांमध्ये रात्रीच्या वेळी कोणतीही अनुचित घटना होऊ नये, यासाठी गावांतील रस्त्यांवर पथदिवे लावले जातात. या पथदिव्यांसाठी महावितरणकडून जोडणी घेतली जाते. तर पथदिव्यांचे वीजबिल देयक जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाकडून भरले जात होते. मात्र गेल्या तीन वर्षांपासून संबंधित विभागाकडून पथदिव्यांचे वीजबिल भरणे बंद आहे. संबंधित ग्रामपंचायतींना पथदिव्यांची बिले भरण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. मात्र कमी निधी व कमी आर्थिक स्त्रोतामुळे ग्रामपंचायत वीज बिल भरण्यास असमर्थ ठरत आहे. त्यामुळे पथदिव्यांचे वीजबिल वाढत असून लाखोंची वीजबिले कोटीत होत आहेत. आजघ्ज्ञडीला जिल्ह्यातील 205 ग्रामपंचायतींचे 3 कोटी 18 लाख 19 हजार 639 रुपयांचे पथदिव्यांचे वीजबिल थकीत असल्याची माहिती आहे. वारंवार विनंती करुनही ग्रामपंचायत प्रशासने बिले भरलेली नाही. त्यामुळे महावितरणकडून आतापर्यंत 205 गावातील पथदिव्यांचा वीजपुरवठा बंद केला आहे. त्यामुळे या गावात रात्रीच्या वेळी नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
आठही विभागात कारवाई…
महावितरणतर्फे जिल्ह्यातील आठही तालुक्यात कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये आमगाव तालुक्यातील 12 गावांचे पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आला असून देवरी 33, अर्जुनी मोर 87, सडक अर्जुनी 12, सालेकसा 51, गोरेगाव 8 व गोंदिया तालुक्यातील 10 गावातील वीजपुरवठा महावितरणने थकीत वीजदेयकापोटी खंडीत केला आहे.