रेशन वाटपात ई-पॉश मशिनच्या तांत्रिक अडचणीत वाढ, संचालकांची डोकेदुखी वाढली

देवरी / गोंदिया 20: शासकीय अन्नधान्याच्या काळाबाजारात पारदर्शकता आणण्यासाठी शासनाकडून धान्य वितरण व्यवस्थेत सुधारणा करण्यात आली आहे. यातंर्गत जिल्ह्यातही धान्य वितरण केंद्रांवर हजारो ई-पॉश मशिन बसविण्यात आल्या आहेत. मात्र याच मशिनच धान्य वितरणात अडसर ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मशिनवर अनेक कार्डधारकांचे अंगठ्यांचे ठसेच उमटत नसल्याने रेशनदुकान संचालकांचीही डोकेदुखी वाढली आहे.

रेशन वाटपात होत असलेला गैरवापर थंबावा यासाठी शासनाच्या वतीने ई-पॉश मशिन सर्वच रेशन धान्य वाटप केंद्रांना सक्तीचे केले आहे. यानुसार जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील 998 अन्नधान्य वितरण केंद्रे ई-पॉश मशिनद्वारे जोडण्यात आले आहे. मात्र अनेकदा सर्वर डाऊन, इंटरनेटमुळे या ई-पॉश मशिन शोभेच्या वस्तू ठरताना दिसतात. त्यातच जिल्ह्यातील बर्‍यांच गावांमध्ये असलेल्या रेशन दुकानातील ई-पॉश मशिनवर नागरिकांच्या अंगठ्यांचे ठसे उमटत नसल्याचा प्रकार पुढे आला आहे.

यासंदर्भात धान्य पुरवठा विभागाने सांगितले की, ई-पॉश मशिनबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तसेच विभागातील तांत्रिक कर्मचार्‍यांकडून या पॉश मशिनच्या दुरुस्तीची कामे सुरु आहेत. विशेष म्हणजे, संबंधित क्षेत्रातील लोकप्रतिनिधींनाही याबाबत जाणीव करुन दिली आहे. मात्र परिस्थिती ‘जैस थे’च असल्याने जिल्ह्यातील रेशन कार्डधारकांसाठी शासनाची धान्य वितरण व्यवस्था अडचणीची ठरत आहे.

जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील 998 धान्य वितरण केंद्रांवर ई-पॉश मशिनद्वारे कार्डधारकांना धान्य वाअप करण्यात येत आहे. ई-पॉश मशिनबाबत दररोज दोन ते तीन तक्रारी येत आहेत. वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधींना कळविले असून वितरण केंद्रांवर तांत्रिक विभागातील कर्मचार्‍यांकडून सदर ई-पॉश मशिन दुरुस्तीचे कामे युद्धस्तरावर सुरु असल्याची माहिती धान्य पुरवठा निरीक्षक भारती वाकोडे यांनी दिली.

Print Friendly, PDF & Email
Share