पेरणीसाठी थांबलेला बळीराजा सुखावला
जिल्हात पावसाच्या हजेरीने वातावरणात गारवा
देवरी : मान्सूनचे आगमन होऊनही जिल्ह्यात पावसाची प्रतिक्षा होती. ती 18 जून रोजी मध्यरात्रीपासून सुरु झालेल्या पावसाने संपविली. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे, तर आभाळाकडे नजर लाऊन बसलेल्या शेतकर्यांच्या डोळ्यात पुन्हा आशा पल्लवीत झाल्या असून आता शेतकरी पेरणीच्या कामाला लागलेला आहे .
हवामान खात्याने यंदा मान्सूनच्या सुरुवातीलाच चांगला पाऊस होण्याची शक्यता वर्तविली होती. त्यामुळे शेतकरीही सुखावला होता. मृग नक्षत्रातील पावसाने जिल्ह्यात पावसाने तुरळक हजेरी लावली. त्यामुळे शेतकर्यांना दिलासा मिळाला. मात्र उकाड्यामुळे सर्वसामान्य नागरिकाना सुटका मिळाली नाही. त्यामुळे सर्वांचीच नजर पावसाकडे होती. दरम्यान चालू आठवडाभर आकाशात काळे ढग जमा होत असताना पावसाची प्रतिक्षा कायम होती. त्यामुळे शेतकर्यांची चिंता वाढली होती.
मात्र शनिवारी रात्री व रविवारी सकाळी झालेल्या चांगल्या पावसामुळे सर्वांनाच दिलासा दिला आहे. जिल्ह्यातील काही ठिकाणी दमदार तर काही ठिकाणी मध्यम पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकर्यांसह सर्वसामान्य नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे. वातावरणात गारवा निर्माण झाला असल्याने उन्हाच्या काहिलीपासून सुटका मिळाली आहे, तर जेथे दमदार पाऊस झाला तेथे खरीप पिकाच्या पेरणीच्या कामास आता वेग येणार आहे. असे असले तरी जिल्ह्याला अद्यापही दमदार पावसाची प्रतिक्षा आहे.