अग्निपथ वरून माघार नाही : तिन्ही सैन्यदले निर्णयावर ठाम : दंगलखोरांना सैन्य भरतीची दारे बंद

मुंबई : चार वर्षांच्या कंत्राटी सैन्यभरतीवरून 12 राज्यांत तरुणांच्या संतापाचा आगडोंब उसळला. या उद्रेकानंतरही संरक्षण मंत्रालय ‘अग्निपथ’ योजनेवर ठाम राहिले आहे. रविवारी तिन्ही सैन्यदलांतर्फे संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली.
‘अग्निपथ’ योजना मागे घेणार नाही. उलट भविष्यात सैन्यातील सर्व भरती याच योजनेअंतर्गत केली जाईल. तसेच या योजनेविरोधात जाळपोळ, तोडफोड केलेल्या दंगलखोरांना सैन्यभरतीची दारे बंद असतील, अशी भूमिका सैन्यदलांनी पत्रकार परिषदेतून मांडली.
‘अग्निपथ’ योजना म्हणजे राष्ट्रीय सुरक्षेसाठी टाकलेले पुढचे पाऊल आहे.

योजनेत बदल केले जातील, पण ही योजना मागे घेणार नाही, अशी स्पष्टोक्ती लेफ्टनंट जनरल अनिल पुरी यांनी दिली. कोचिंग इन्स्टिटय़ूट चालवणाऱया मंडळींनी अग्निपथविरोधात तरुणांना भडकावले आणि निदर्शने करायला लावली, असा दावाही त्यांनी केला. ‘अग्निवीर’ बनणाऱया तरुणांनी योजनेविरोधातील कुठल्याही आंदोलनात किंवा तोडफोड वा जाळपोळीमध्ये सहभाग घेतला नसल्याचे शपथपत्र द्यावे. पोलीस पडताळणीशिवाय कुणालाही सैन्यात घेणार नाही. सैन्यात बेशिस्तीला अजिबात थारा नसेल. ‘अग्निपथ’वरून मोठा आगडोंब उसळेल याची आम्ही कल्पनाही केलेली नव्हती. सीडीएस व तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुखांनी एकत्र मिळून इतर देशांतील सैन्याचे सरासरी वय विचारात घेतले. सैन्यदलात बदलाची प्रक्रिया 1989 पासून सुरू आहे. आम्हाला सैन्यात तरुण पाहिजेत, असे लेफ्टनंट जनरल पुरी म्हणाले. ‘अग्निपथ’च्या घोषणेनंतर योजनेत केलेले बदल हे कुठल्याही भीतीपोटी नव्हे, तर ते आधीच ठरलेले होते, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

आज ‘भारत बंद’ ची हाक
अग्निपथ योजनेविरोधात देशातील विविध संघटनांनी सोमवार, 20 जूनला ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांमध्ये सुरक्षा वाढविली आहे.

भरती प्रक्रिया अशी असेल
नौदलः या दलातील ‘अग्निवीरां’ची पहिली तुकडी 21 नोव्हेंबरपासून ओडिशामध्ये ‘आयएनएस चिल्का’ येथील ट्रेनिंग इन्स्टिटय़ूटमध्ये दाखल होण्यास सुरुवात करेल. महिला आणि पुरुष दोन्ही ‘अग्निवीरां’ना परवानगी असेल.
लष्करः जवळपास 40 हजार ‘अग्निवीरां’च्या भरतीसाठी ऑगस्ट ते ऑक्टोबरदरम्यान 83 भरती शिबिरे घेतली जातील. डिसेंबरमध्ये 25 हजार ‘अग्निवीरां’ची पहिली तुकडी व फेब्रुवारीपर्यंत दुसरी तुकडी लष्करात दाखल होईल.
हवाई दलः डिसेंबरमध्ये ‘अग्निवीरां’ची पहिली तुकडी तयार करून या तुकडीला 30 डिसेंबरपासून प्रशिक्षण दिले जाईल. यासाठी येत्या 24 जूनपासून नोंदणी प्रक्रिया आणि 24 जुलैपासून ऑनलाइन परीक्षेची प्रक्रिया सुरू होईल.

अग्निवीरांना भाजपकडून सिक्युरिटी गार्डची ऑफर ! विरोधकांनी डागले टीकास्त्र
भाजप कार्यालयांबाहेर सिक्युरिटी गार्ड नेमायचे असतील त्यावेळी ‘अग्निपथ’ योजनेतून चार वर्षांनी बाहेर पडणाऱया ‘अग्निवीरां’ना गार्डच्या नोकरीत प्राधान्य देऊ, अशी वादग्रस्त घोषणा भाजपचे राष्ट्रीय महासचिव कैलास विजयवर्गीय यांनी इंदूरमध्ये केली. त्यांच्या विधानावर काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी जोरदार टीकास्त्र डागले. ‘देशातील तरुणांचा, सैन्यातील जवानांचा एवढाही अपमान करू नका. त्यांना आयुष्यभर देशसेवा करायची असते म्हणून ते कठोर मेहनत घेतात,’ असे ट्विट ‘आप’चे नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले.

कोचिंग क्लासेसचा हात
हिंसाचारामागे सैन्य दलात भरती करण्यासाठी युवकांना प्रशिक्षण देणाऱया कोचिंग क्लासेसचा हात असल्याचे समोर आले आहे . पोलिसांनी बिहारमधील तीन तर तेलंगाणामधील एका कोचिंग क्लासविरोधात गुन्हा दाखल केला आहे . आतापर्यंत 145 युवकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर 804 जणांना अटक करण्यात आली आहे .

दिल्लीत जंतरमंतरवर काँग्रेसचा सत्याग्रह
केंद्र सरकारने वादग्रस्त ‘अग्निपथ’ योजना मागे घ्यावी, अशी मागणी करीत काँग्रेसने रविवारी राजधानी दिल्लीतील जंतरमंतरवर सत्याग्रह केला. यात काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी-वढेरा यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते सहभागी झाले. ‘अग्निपथ’ योजना देशातील तरुणांना मारेल, सैन्य संपवेल, असा आरोप प्रियंका गांधी यांनी केला.
येत्या 24 जूनपासून हवाई दल, 25 जूनपासून नौदल आणि 1 जूनपासून लष्कराची भरती प्रक्रिया सुरू होईल.
डिसेंबरमध्ये 25 हजार ‘अग्निवीरां’ची पहिली तुकडी रुजू होईल. फेब्रुवारी 2023 मध्ये ‘अग्निवीरां’ची दुसरी तुकडी रुजू होईल. निदर्शने आणि तोडफोड करणाऱया तरुणांना ‘अग्निवीर’ बनता येणार नाही. लष्करात यापुढे सर्व सैनिकांची भरती ‘अग्निपथ’ योजनेंतर्गतच करणार. नौदलात महिला ‘अग्निवीरां’ची भरती करणार. युद्धनौकांवर तैनात केले जाईल. ‘अग्निपथ’ योजना मागे घेण्याची अजिबात गरज नाही .
‘अग्निवीरा’ला वीरमरण आल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपये. तिन्ही सैन्यदलांमध्ये पाच वर्षांत सव्वा लाख ‘अग्निवीरां’ची फौज तयार होईल. ‘अग्निवीरां’ना इतर सैनिकांपेक्षा अधिक भत्ते दिले जाणार आहेत.

Share