इंधन वाढीमुळे प्रवास भाड्यात वाढ, विद्यार्थ्यांची वाट होणार बिकट

गोंदिया: केंद्रीय शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईच्या शाळा सुरू झाल्या असून 27 जूनपासून राज्य शिक्षण मंडळाच्या सर्व शाळा सुरू होणार आहेत. मुले शाळेत जाणार असल्याने पालकांची लगबग सुरू आहे. शाळांनी देखील जय्यत तयारी सुरू केली आहे. पण, विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे शाळेत पोचविणारे स्कूलबसवाले काका आहेत कुठे? कारण मागच्या दोन वर्षांत आर्थिक हप्ते थकल्याने बँका व फायनान्स कंपन्यांनी बस जप्त केल्या आहेत. काही बस घरासमोरच धूळखात पडल्या. त्यामुळे यंदा स्कूल बस विद्यार्थी सेवेत धावणार की नाही, अशी शंका पालक व विद्यार्थी वर्गात निर्माण झाली आहे. याचा थेट फटका विद्यार्थ्यांना बसण्याची शक्यता आहे.

गोंदिया जिल्ह्यात स्कूल बस व व्हॅनद्वारे दररोज हजारो विद्यार्थ्यांची वाहतूक होते. दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात जवळपास दोनशे स्कूल बस, व्हॅनमधून विद्यार्थ्यांची वाहतूक होत होती. त्यात आता घट झाली असून केवळ 106 स्कूल बसेसची नोंदणी उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे झाली आहे. जवळपास निम्म्या स्कूल बस या सेवेतून बाहेर पडल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत पोचण्यासाठी पालकांची चांगलीच धांदल उडणार आहे. कोरोनाकाळात शाळा बंद झाल्या. स्कूल बसचालकांचे उत्पन्न बंद झाले. बँका व फायनान्स कंपनीचे हप्ते थकले, त्यामुळे वाहन जप्त झाले. तर काही चालकांनी आपले वाहन विकून दुसरा व्यवसाय सुरू केला. दोन वर्षे स्कूल बस बंद असल्याने आता ती सुरू करण्यासाठी हजारो रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यात त्यांच्या देखभालीपासून ते विम्याचे हप्ते, आरटीओ पासिंग आदींचा खर्च देखील करावा लागणार आहे. त्यामुळे अनेक स्कूल बसचालक एवढी रक्कम खर्च करून पुन्हा हा व्यवसाय सुरू करण्याच्या मानसिकतेत नाही. त्यामुळे अनेक स्कूल बसचालकांनी या व्यवसायातून माघार घेतली.

एकूण वाहतुकीपैकी सुमारे 60 टक्के वाहतूक ही खासगी आहे. यात स्कूल बस, व्हॅन व रिक्षाच्या माध्यमातून वाहतूक होते. तर शाळेच्या स्वतःच्या आठ ते दहा टक्के बस आहेत. शिवाय, 10 टक्के पालक आपल्या पाल्यांना शाळेत स्वतः सोडतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणांत वाहतूक ही खासगी वाहनाद्वारे होते. ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरातील शाळांमध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस व मानव विकास कार्यक्रमांतर्गत सुरू असलेल्या बसेस मधून शालेय प्रवास करतात.

तीन वर्षात डिझेल 30 व पेट्रोल 27 रुपयांनी वाढले

गत तीन वर्षापासून इंधनाच्या दरांमध्ये सातत्याने वाढ झाली आहे. जानेवारी 2020 मध्ये एक लिटर डिझेल 67 रुपये तर पेट्रोल 80 रुपये होते. जानेवारी 21 मध्ये डीजल 79 रुपये तर पेट्रोल 92 रुपये, जानेवारी 22 मध्ये डीजल 104 रुपये, पेट्रोल 122 रुपये तर आज 17 जूनला एक लिटर डिझेल 97.33 तर पेट्रोलचे दर 112. 89 रुपये प्रति लिटर आहेत. या इंधन दरवाढीचा फटका ही स्कूलबस चालकांना बसला असून त्यांनी विद्यार्थी प्रवास भाड्यात 30 ते 40 टक्क्यांनी वाढ केली असल्याने या वाढीचा आर्थिक फटका पालकांच्या खिशाला बसणार आहे.

Print Friendly, PDF & Email
Share